शाळांमध्ये मोबाइल बंदी, शिक्षणासाठी मोठा निर्णय; ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 06:08 AM2024-02-21T06:08:00+5:302024-02-21T06:09:06+5:30
मुलांना लागलेले मोबाइल फोनचे व्यसन आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांना कंटाळून ब्रिटनने शाळांमध्ये मोबाइलवर बंदी घातली आहे.
इग्लंड : मुलांना लागलेले मोबाइल फोनचे व्यसन आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांना कंटाळून ब्रिटनने शाळांमध्ये मोबाइलवर बंदी घातली आहे. ब्रिटनच्या या निर्णयानंतर अनेक देशांमध्ये याची चर्चा सुरू झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एक व्हिडीओ शेअर करून याची घोषणा केली आहे.
व्हिडीओमध्ये ऋषी सुनक यांचा फोन सतत वाजत असल्याचे दिसत आहे. सुनक यांनी व्हिडीओच्या माध्यमातून हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे की, मोबाइल फोनमुळे कशा समस्या निर्माण होत आहेत.
माध्यमिक शाळेतील सुमारे एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी सांगितले की, फोनमुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. मोबाइलमुळे मुलांचे वर्गात लक्ष विचलित होते आणि ते खोड्या करतात, असे ते म्हणाले.
अनेक शाळांनी यापूर्वीच मोबाइलवर आधीच बंदी घातली आहे, ज्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि चांगले शिक्षण वातावरण निर्माण झाले आहे. शाळांना मोबाइल बंदीचे विविध मार्ग अवलंबविता येतील. यात फोन घरीच ठेवणे, शाळेच्या लॉकरमध्ये ठेवणे किंवा विद्यार्थ्यांना काही अटींवर ठेवण्याची परवानगी देणे याचा समावेश आहे. ९७ टक्के मुले मोबाइल फोनमुळे विचलित होत असल्याचे एका आकडेवारीतून समोर आले आहे.