"एकेकाळी मेकअपवर केला होता 3 कोटींचा खर्च, पण आता..." मॉडेलने सांगितली आपली कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 04:52 PM2023-04-29T16:52:58+5:302023-04-29T16:53:24+5:30
विशेष म्हणजे, नॅन्नेट्टे हॅमंड लॉसियावोने एका अतिशय श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न केले होते.
महागड्या गाड्यांमधून फिरून आलिशान जीवन जगणाऱ्या मॉडेलला आता टॅक्सी चालक म्हणून काम करावे लागत आहे. एकेकाळी मॉडेलने आपल्या कॉस्मेटिक सर्जरीवर 3 कोटींहून अधिक खर्च झाला होता. पण आता तिला पैशांची कमतरता भासत आहे. स्वतः मॉडेलने आपली कहाणी सांगितली आहे.
'डेली स्टार'ला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकन मॉडेल नॅन्नेट्टे हॅमंड लॉसियावोने सांगितले की, सध्या रस्त्यावर कॅब चालवत आहे. रोजचा खर्च भागवण्यासाठी मी गाडी चालवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, पतीपासून घटस्फोटाची केस हरल्यानंतर तिच्यावर अशी परिस्थिती ओढवली आहे. नॅन्नेट्टे हॅमंड लॉसियावोच्या म्हणण्यानुसार, घटस्फोटानंतर तिच्या पतीने सर्व गाड्या घेतल्या. त्यानंतर तिने ड्रायव्हर होण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, नॅन्नेट्टे हॅमंड लॉसियावोने एका अतिशय श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न केले होते. या दोघांचे लग्न सुमारे 17 वर्षे टिकले. या काळात नॅन्नेट्टे हॅमंड लॉसियावोला कधीही काम करण्याची गरज भासली नाही आणि पैशांचीही कमतरता भासली नाही. पतीच्या पैशावर ती लग्जरी लाइफ एन्जॉय करत होती. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या होत्या. घर एखाद्या आलिशान महालासारखे होते. इतकंच नाही तर नॅन्नेट्टे हॅमंड लॉसियावो परदेशात पर्यटनासाठी जात होती.
याशिवाय, बार्बी डॉलसारखी दिसण्यासाठी तिने 3 कोटी 60 लाख रुपये खर्च करून आपली प्लास्टिक सर्जरी करून घेतली होती. मात्र, पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर, नॅन्नेट्टे हॅमंड लॉसियावोच्या लाइफमध्ये रिव्हर्स गिअर पडला.तिची लाइफस्टाइल पूर्णपणे बदलली. पतीने नॅन्नेट्टे हॅमंड लॉसियावोकडील कार, बंगला, बँक बॅलन्स काढून घेतला. पतीकडून पोटगी मिळावी म्हणून कोर्टात केस केली होती, पण ती केस सुद्धा नॅन्नेट्टे हॅमंड लॉसियावो हरली. सध्या नॅन्नेट्टे हॅमंड लॉसियावो भाड्याच्या घरात राहत आहे.
सौंदर्याचे कौतुक
याचबरोबर, कॅब ड्रायव्हर म्हणून काम करत असलेल्या नॅन्नेट्टे हॅमंड लॉसियावोने सांगितले की, जेव्हाही ती कोणालातरी घेण्यासाठी जाते तेव्हा लोक तिला पाहून आश्चर्यचकित होतात. लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करतात. मॉडेलसारखी दिसणारी महिला ड्रायव्हर म्हणून काम करते, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.