मोदी जाणार पाकला......
By admin | Published: July 11, 2015 02:57 AM2015-07-11T02:57:25+5:302015-07-11T02:57:25+5:30
वर्षभरापूर्वीच्या शपथविधीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या शुक्रवारी येथे प्रथमच झालेल्या
उफा (रशिया) : वर्षभरापूर्वीच्या शपथविधीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या शुक्रवारी येथे प्रथमच झालेल्या भेटीने द्विपक्षीय संबंधांतील तणाव काहीसा निवळला असून, ठप्प पडलेली संवाद प्रक्रिया पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई हल्ल्याचा खटला जलद गतीने चालवण्याचे आश्वासन शरीफ यांनी दिले असून, मोदी यांनी पुढील वर्षी होणाऱ्या ‘सार्क’ देशांच्या शिखर परिषदेसाठी पाकिस्तानला जाण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या दरम्यान उभय पंतप्रधानांची ही भेट झाली. भारत व पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनुक्रमे अजित डोवल व सरताज अजीज यांची भेट नवी दिल्ली येथे आॅगस्ट वा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. या बैठकीत दहशतवादासंदर्भात सर्व मुद्द्यावर चर्चा होईल. हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे़ सरताज अजीज हे पाकिस्तानातील योग्य व्यक्ती असून त्यांच्यावर पाक लष्कराचाही विश्वास आहे, असे सूत्रांनी सांगितले. चर्चेचा मुख्य विषय दहशतवाद शुक्रवारच्या बैठकीत चर्चेचा मुख्य मुद्दा दहशतवाद हाच होता. भारत -पाक संबंध सुधारण्यासाठी दहशतवादाची समस्या सुटणे गरजेचे आहे, असे भारताचे मत आहे. मोदी व शरीफ यांच्यात गेल्या वर्षी मे महिन्यात चर्चा झाली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी आले होते. त्यानंतर
काठमांडू येथे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे दोघे समोरासमोर आले , पण दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देण्यापुरतीच ही भेट मर्यादित राहिली.
दोन्ही देशाचे परराष्ट्र सचिव गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात इस्लामाबाद येथे भेटणार होते, पण भारताने ही भेट रद्द केली. पाकिस्तानचे भारतातील दूत चर्चेआधी काश्मीरमधील फुटीरवादी नेत्याना भेटले , त्याचा भारताने निषेध केला होता. (वृत्तसंस्था)
—————————————
५६ इंची छातीचे काय झाले?
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत असताना रालोआ सरकारला कठोर कारवाई करण्यात अपयश आले आहे. ५६ इंची छातीची ग्वाही देत पाकिस्तानला धडा शिकवू म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी निष्क्रिय बनले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला.मोदींनी शरीफ यांची रशियात भेट घेतली त्याचवेळी भारताचे लष्करप्रमुख पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनादरम्यान शहीद झालेल्या जवानाला आदरांजली अर्पण करीत होते याकडे लक्ष वेधून काँग्रेसचे प्रवक्ते मीम अफझल म्हणाले की, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताविरुद्ध अण्वस्त्रांच्या वापराची धमकी दिल्यानंतर लगेच मोदींनी शरीफ यांच्याशी चर्चा केली. या चर्चेपूर्वी पाकिस्तानने कोणता संदेश दिला हे दिसून आलेच. गेल्या वर्षभरात पाकिस्ताने शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा विक्रमच केला आहे, असेही ते म्हणाले.
———————————————-
आशेचा किरण ठरणारी भेट- भाजप
मोदी-शरीफ यांची भेट ही द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेने आशेचा किरण ठरणारी आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताची दहशतवादाची व्याख्या स्वीकारली आहे, असे भाजपचे प्रवक्ते एम.जे. अकबर यांनी म्हटले. दोन देशांना संबंध बळकट करण्याच्यादृष्टीने संधी मिळाली आहे. अकबर यांनी बरेचदा कदाचित किंवा संभवत: या शब्दांचा वापर करीत पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत कठोर भूमिका राहणार नसल्याचे संकेत दिले आहेत. भाजपची ही प्रतिक्रियाही सावध अशीच मानली जाते. चर्चा ही ‘प्रगती’कडे नेणारी असल्याचे विश्लेषण त्यांनी वापरले. सर्वच प्रकारचा दहशतवाद अस्वीकारार्ह असतो. पाकिस्तानने चांगला आणि वाईट दहशतवाद असा भेदभाव करीत जो खेळ चालविला होता त्यात बदल झालेला आहे, असेही ते म्हणाले.
—————————————————-
ठप्प झालेली द्विपक्षीय चर्चा पुनरुज्जीवित करणे ही सकारात्मक घडामोड आहे. द्विपक्षीय संबंध सुरळीत करण्याच्या दिशेने ही वाटचाल आहे. वेगवेगळ्या स्तरावर चालणाऱ्या चर्चेतून नव्या शक्यता खुल्या होण्याची आशा आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुत्सद्याची भूमिका अवलंबल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
- राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्री.