मोदींची मंगोलियावर कृपादृष्टी, १ अब्ज डॉलर्सची मदत दिली
By admin | Published: May 17, 2015 12:10 PM2015-05-17T12:10:04+5:302015-05-17T12:57:59+5:30
चीन दौरा आटपून मंगोलियात दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियावर कृपादृष्टी दाखवत १ अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे.
ऑनलाइन लोकमत
उनलबटोर, दि. १७ - चीन दौरा आटपून मंगोलियात दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियावर कृपादृष्टी दाखवत १ अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. सुरक्षा, सायबर सुरक्षा, उर्जा अशा विविध मुद्यांवरील १४ करारांवर दोन्ही देशांनी रविवारी स्वाक्षरी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या परदेश दौ-यावर असून पहिल्या टप्प्यात मोदींनी चीनचा दौरा केला होता. चीननंतर मोदी मंगोलियात दाखल झाले आहेत. चीन व मंगोलिया यांच्यात वैमनस्य असून मंगोलियात जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. मंगोलियात संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी आर्थिक क्षमता व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारत मंगोलियाला एक अब्ज डॉलर्सची मदत करेल अशी घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेनंतर मोदींनी मंगोलियाच्या संसदेलाही संबोधित केले.
भारत व मंगोलिया हे अध्यात्मिक दृष्ट्या एकमेकांच्या जवळ असूनही त्यातुलनेत दोन्ही देशांमधील आर्थिक हितसंबंधांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. पण आता या दोन्ही देशांनी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य वाढवायची गरज आहे असे मोदींनी सांगितले. गौतम बुद्धांची विचारधारा व लोकशाहीच्या आधारे भारत व मंगोलिया आशियामध्ये शांतता, मैत्री, बंधूत्व व सहकार्याची भावना निर्माण करु शकतील असेही त्यांनी म्हटले आहे.