मोदींनी भेट म्हणून दिली चंदनाची पेटी, हिरा; अमेरिकेने भारतासाठी अंथरले रेड कार्पेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 08:17 AM2023-06-23T08:17:16+5:302023-06-23T08:18:07+5:30
मोदींनी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा प्रयोगशाळेत बनवलेला पर्यावरणपूरक हिरवा हिरा भेट म्हणून दिला.
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना वनस्पती आणि प्राणी यांचे मनोहारी कोरीव काम असलेली हस्तनिर्मित सुंदर चंदनाची पेटी भेट दिली. म्हैसूरच्या चंदनाच्या लाकडापासून बनवलेली ही पेटी जयपूरच्या एका अनुभवी कारागिराने बनवली आहे. महाराष्ट्रामध्ये तयार झालेला गूळही बायडन यांना भेट देण्यात आला. मोदींनी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा प्रयोगशाळेत बनवलेला पर्यावरणपूरक हिरवा हिरा भेट म्हणून दिला.
‘व्हाइट हाऊस’मध्ये खासगी रात्रभोजन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी बुधवारी व्हाइट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासाठी एका खासगी रात्रभोजनाचे आयोजन केले होते. बायडेन दाम्पत्याने पंतप्रधान मोदींचे व्हाइट हाऊसमध्ये जोरदार स्वागत केले. आत जाण्यापूर्वी त्यांनी फोटो काढले. सर्वांनी भारताला समर्पित संगीताचा आनंद घेतला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि त्यांचे भारतीय समकक्ष अजित डोवाल उपस्थित होते.
‘पेन मसाला’ने गायले ‘छैय्या-छैय्या’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊस येथे आगमन होण्यापूर्वी ‘पेन मसाला’च्या कलाकारांनी दोन ते तीन हजार लोकांपुढे ‘छैय्या-छैय्या’ तसेच ‘जश्न ए बहारा’ ही गाणी सादर केली. या कलाकारांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही वाद्यवृदांविना गाणी सादर करतात. या कलाकारांमध्ये पेनसिल्वेनिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या ‘पेन मसाला’ची स्थापना ९०च्या दशकात झाली होती. यापूर्वीही त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये सादरीकरण केले होते
चंदनाच्या पेटीत काय?
चंदनाच्या लाकडात कोरलेल्या या पेटीत कोलकाता स्थित सुवर्णकाराच्या पाचव्या पिढीने हाताने बनवलेल्या गणेशाची चांदीची मूर्ती आणि एक दिवा आहे.याशिवाय उपनिषदांच्या १० तत्त्वांवर आधारित पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाच्या पहिल्या आवृत्तीची प्रतही पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना सादर केली. या पुस्तकाचे सहलेखक बायडेन यांचे आवडते कवी विल्यम बटलर येट्स आणि पुरोहित स्वामी आहेत. हे पुस्तक भारतीय अध्यात्म आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची प्रतिष्ठा याबाबत दोन्ही नेत्यांचा सामायिक दृष्टिकोन प्रतिबिंबित करते.
बायडेन यांना गुजरातचे मीठ
भेटवस्तूंमध्ये राजस्थानमधील चांदीचे नारळ, २४ कॅरेट सोन्याचे नाणे आणि हॉलमार्क केलेले चांदीचे नाणे यांचा समावेश आहे. बायडेन यांना कर्नाटकातील म्हैसूर येथून चंदनाचा एक सुगंधित तुकडा, तमिळनाडूतील तीळ देण्यात आले. महाराष्ट्रामध्ये तयार झालेला गूळ जो बायडन यांना भेट देण्यात आला. गुजरातमधील लवण म्हणजेच मीठही भेट देण्यात आले.
मोदींना ‘गॅली’, कॅमेरा भेट
बायडेन दाम्पत्याने मोदींना २० व्या शतकाच्या सुरुवातीचे हस्तनिर्मित प्राचीन अमेरिकन पुस्तक ‘गॅली’ भेट म्हणून दिले. एक विंटेज अमेरिकन कॅमेराही भेट म्हणून दिला होता. इतर भेटवस्तूंमध्ये जॉर्ज ईस्टमनच्या पहिल्या कोडॅक कॅमेरा पेटंटची अभिलेखीय प्रतिकृती प्रिंट, अमेरिकन वन्यजीव छायाचित्रणावरील हार्डकव्हर पुस्तक आणि रॉबर्ट फ्रॉस्टच्या संग्रहित कवितांची स्वाक्षरी केलेली, पहिली आवृत्ती समाविष्ट आहे.
मेन्यूमध्ये मुरवलेली बाजरी, मशरूम
बायडेन दाम्पत्याने बुधवारी खासगी रात्रभोजन दिल्यानंतर व्हाइट हाऊसच्या साऊथ लॉनवर स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ४०० पाहुण्यांना राज्य रात्रभोजन देण्यात येणार आहे. त्यासाठी मुरवलेली बाजरी, मक्क्याचे सलाड आणि भरलेले मशरूम असा मेन्यू असणार आहे. पंतप्रधान मोदी शाकाहारी आहेत, म्हणून शाकाहारी शेफ नीना कर्टिस यांनी खास मेन्यू तयार केला. याशिवाय कोब सॅलड, टरबूज आणि तिखट ॲव्होकॅडो सॉस, क्रीमी केशर-इन्फ्युस्ड रिसोट्टो यांचाही भोजनात समावेश राहील.
मिठाईमध्ये गुलाब, वेलची स्ट्रॉबेरी शॉर्टकेक आणि इतर पदार्थांचा समावेश आहे. इतर पाहुण्यांसाठी मत्स्याहाराचा पर्यायही ठेवण्यात आला. प्रत्येक टेबलवर हिरवी आणि भगवी फुले ठेवली जातील.
काय प्रश्न विचारणार?
मोदी अमेरिकेतील पत्रकार परिषदेत सहभागी होणार आहेत. यावरून मोदींना टोमणे मारणारे ट्वीट काँग्रेसने केले आहे. काँग्रेसने म्हटले की, ९ वर्षांत प्रथमच असे घडते आहे. मोदी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. प्रश्नांना घाबरून फक्त २ प्रश्न विचारण्याची परवानगी आहे. हे २ प्रश्न काय असावेत... तुम्हीच सांगा, असे काँग्रेसने म्हटले आहे.
मुस्लीम समाजाचे रक्षण करावे : ओबामा
भारतामध्ये अल्पसंख्याक असलेल्या मुस्लीम समाजाच्या रक्षणासाठी ठोस पावले उचलावीत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगावे अशी मागणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. भारतातील अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे रक्षण न केल्यास त्या देशासमोर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही ओबामा यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
या भेटीमुळे आम्ही जगातील सर्वात जुन्या आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहींना एकत्र आणत आहोत. अनेक वर्षांच्या मजबूत संबंधांनंतर, अमेरिका-भारत भागीदारी अधिक घट्ट होत आहे.
- जिल बायडेन