भारताने युनोला भेट दिलेल्या सोलार पार्कचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:36 AM2019-09-26T02:36:27+5:302019-09-26T02:37:03+5:30
गांधी सोलार पार्क आणि गांधी पीस गार्डनचे उद्घाटन
संयुक्त राष्ट्रे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेझ यांच्यासह जगातील इतर नेत्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या येथील मुख्यालयात मंगळवारी गांधी सोलार पार्क आणि गांधी पीस गार्डनचे उद्घाटन केले. मोदी यांच्यासोबत यावेळी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन, सिंगापूरचे पंतप्रधान ली सिन लुंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, जमेकाचे पंतप्रधान अॅण्ड्र्यू होलनेस आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंदा अरडेर्न यांची उपस्थिती होती. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मोदी यांनी ‘लीडरशिप मॅटर्स : रिलेव्हन्स ऑफ गांधी इन द कॉन्टेंपररी वर्ल्ड’चे आयोजन केले होते.
गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रांनी विशेष टपाल तिकीटही जारी केले. या सोलार पार्कसाठी सुमारे एक दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च झाले आहे. युनोच्या मुख्यालयाच्या छतावर सोलार पॅनल्स बसविण्यात आले आहेत.
ट्रम्प यांच्याकडून प्रोत्साहन
पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना ‘प्रोत्साहन’ देऊन काश्मिरी लोकांचे जीवनमान सुधारण्याचे दिलेले आश्वासन मोदी यांनी पूर्ण करावे, असे आवाहन केले. ट्रम्प आणि मोदी यांच्यात मंगळवारी ४० मिनिटे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात व्हॉईट हाऊसने म्हटले की, चर्चेचा मुख्य भर हा द्विपक्षीय व्यापार आणि पाकिस्तानातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया यांच्यावर होता.