दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ‘मोदी जॅकेट’च्या प्रेमात; ट्विट करुन मानले मोदींचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 05:05 AM2018-11-02T05:05:36+5:302018-11-02T06:53:05+5:30
जॅकेटमधील फोटोसह ट्वीट करून मोदींना दिले धन्यवाद
नवी दिल्ली : दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून-जे-इन यांनी भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॅकेटची भरभरून प्रशंसा केली होती. या जॅकेटमध्ये तुम्ही खूपच रुबाबदार दिसतात, अशी तारीफही त्यांनी केली होती. पंतप्रधान मोदी यांनी सद्भावनेतून मून यांना काही खास तयार केलेली जॅकेटस् भेट दिली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मलाही काही सुंदर जॅकेटस् पाठविली आहेत. ही जॅकेटस् भारतीय पारंपरिक पोशाखांच्या मालिकेतील आधुनिक वस्त्रालंकार आहेत.
मोदी जॅकेट कोरियातही परिधान करता येऊ शकतात. त्यांनी पाठविलेली जॅकेटस् मला येतील अशीच आहेत, असे मून यांनी ट्वीट करून या भेटीबद्दल मोदी यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत. याच ट्वीटसोबत त्यांनी ‘मोदी जॅकेट’मधील स्वत:ची छायाचित्रेही जोडली आहेत. याच छायाचित्रांसोबत मून यांनी विविध रंगातील चार जॅकेटस्ही प्रदर्शित केली आहेत.
तथापि, ही जॅकेटस् वस्तूत: ‘नेहरू जॅकेटस्’ असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकार संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या योजनांचे नामांतर केले आहे. मोदींनी नेहरूजॅकेटचेही नामांतर केले आहे, असेही अनेकांनी ट्वीटमधून म्हटले आहे.