शिखर संमेलनात मोदी-पुतीन चर्चा
By admin | Published: December 25, 2015 12:49 AM2015-12-25T00:49:03+5:302015-12-25T00:49:03+5:30
प्रतिवर्षी होणाऱ्या भारत - रशिया शिखर संमेलनात गुरुवारी रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभयपक्षी संबंंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली.
मॉस्को : प्रतिवर्षी होणाऱ्या भारत - रशिया शिखर संमेलनात गुरुवारी रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभयपक्षी संबंंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत करण्यावर उभय नेत्यांनी भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून आज सोळाव्या भारत -रशिया शिखर संमेलनात उभय नेत्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. या बैठकीनंतर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. उभय नेत्यांनी क्रेमेलिनमध्ये प्रारंभी थेट चर्चा केली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टष्ट्वीट केले.
भारत व रशिया यांचे उभयपक्षी संबंध जुने असून सन २००० पासून एकदा रशियात तर पुढच्या वेळी भारतात अशी द्विपक्षीय चर्चा होत असते. अध्यक्ष पुतीन यांनी काल रात्री मोदी यांच्या सन्मानार्थ मेजवानी दिली. त्यावेळी उभय नेत्यांमध्ये परस्पर हितांवर चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांचे मॉस्कोत चांगले स्वागत झाले. या दौऱ्यादरम्यान उभयपक्षी संरक्षण, अणुऊर्जा, हायड्रोकार्बन आदींबाबत द्विपक्षीय करार होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
अनेक करारांची शक्यता
उभय देशांमध्ये संरक्षण क्षेत्रातही करार होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील कुडनकूलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाच व सहाव्या संयंत्राच्या स्थापनेसाठी भारत जागा उपलब्ध करून देणार आहे. यावरही दोन्ही देशांत चर्चा अपेक्षित आहे. मोदी व पुतीन दुसऱ्यांदा भेटत आहेत. पंधराव्या शिखर बैैठकीसाठी पुतीन नवी दिल्लीत आले होते. उभय देशांमध्ये आता १० अब्ज डॉलर्सचा व्यापार असून येत्या दहा वर्षांत तो ३० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक व्हावा, असा दोन्ही देशांचा मानस आहे.
आपत्ती व्यवस्थापन
केंद्राला मोदींची भेट
मॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रशियाच्या मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट दिली. हे केंद्र आपत्कालीन स्थितीचा मुकाबला, तसेच विविध संबंधित संस्था, संघटनांत समन्वय राखण्याचे काम करते. मोदी जवळपास अर्धा तास केंद्रात होते. हे केंद्र एमरकोम या लघु नावानेही ओळखले जाते. या केंद्रातील विविध शाखांद्वारे सतत २४ तास काम करण्याबाबत माहिती दिली.
> मोदींना मिळाली मौल्यवान भेट
मॉस्को : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महात्मा गांधी यांच्या डायरीतील एक हस्तलिखित पान आणि बंगालची १८ व्या शतकातील तलवार भेट दिली. मोदी रशिया दौऱ्यावर आहेत.
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मला बापूंच्या डायरीचे एक पान भेट दिले असून, त्यावर बापूंनी हातांनी लिहिलेल्या काही टिपण्या आहेत. याशिवाय पुतीन यांंनी बंगालची १८ व्या शतकातील तलवार भेट दिली. या तलवारीवर चांदीच्या तारांचे नक्षीकाम केलेले आहे. मी या अमूल्य भेटीबद्दल त्यांचे आभार मानतो. पुतीन यांनी क्रेमलीनमध्ये खासगी भेटीदरम्यान मोदींना या वस्तू भेट दिल्या. या भेटीदरम्यान उभय नेत्यांनी दोन्ही देशांच्या संयुक्त हिताशी संबंधित मुद्यावर चर्चा केली. (वृत्तसंस्था)