मोदींची पाकिस्तानशी चर्चा सुरू करण्याची तयारी; पण ट्रम्प यांच्यासमोर ठेवली एकच अट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 05:32 PM2019-09-25T17:32:52+5:302019-09-25T17:34:01+5:30
मंगळवारी अमेरितकेतील संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली.
न्युयॉर्क : उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा थांबविली होती. यानंतर निवडून आलेल्या पाकिस्तान सरकारने वेळोवेळी भारताला चर्चेची विनंती केली होती. मात्र, भारताने ठाम नकार दिला होता. जम्मू काश्मीरच्या 370 कलम हटविल्यावरून पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस, बससेवा बंद केली होती. तसेच तणावाच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तान आणि भारतामध्ये समेट घडविण्याचे वक्तव्ये अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.
मंगळवारी अमेरितकेतील संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्याकडे पाकिस्तानशी चर्चा करण्यास तयारी असल्याचे सांगितले. मात्र, ही चर्चा तेव्हाच सुरू होईल जेव्हा इम्रान खान दहशतवाद्यांविरोधात ठोस आणि निर्णायक कारवाई करतील, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले. यावर ट्रम्प यांनी विश्वास दर्शविताना दोन्ही देश काश्मीर प्रश्नावर काहीतरी तोडगा काढतील असे सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटल्यानुसार दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली. यामध्ये द्विपक्षीय व्यापार आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर चर्चा झाली. यावेळी मोदी यांनी ट्रम्प यांचे हाऊडी मोदी कार्यक्रमाला आल्याचे आभार मानले. तसेच सहपरिवार भारतात येण्याचे निमंत्रण दिले.
यावेळी मोदी यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतावादामुळे गेल्या 30 वर्षांत 42 हजार नागरिकांना प्राण गमवावे लागल्याचा मुद्दा मांडला. तसेच दहशतवादाविरोधात लढण्यासाठी जागतिक शक्तींचे समर्थन मागितले आहे. पठानकोट हल्ल्य़ातील दोषींना पाकिस्तानने अद्याप शिक्षा दिली नसल्याचेही मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितले.