विकसित राष्ट्रांना मोदींनी फटकारले
By admin | Published: December 1, 2015 02:51 AM2015-12-01T02:51:26+5:302015-12-01T02:51:26+5:30
भारतासारख्या विकसनशील देशांवर उत्सर्जन कमी करण्यासाठी दडपण आणणे नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित देशांना दिला.
पॅरिस : भारतासारख्या विकसनशील देशांवर उत्सर्जन कमी करण्यासाठी दडपण आणणे नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित देशांना दिला. विकसनशील देशांना आपल्या विकासासाठी कार्बन जाळण्याचा हक्क असल्याचे मोदी म्हणाले.
‘फायनान्शियल टाइम्स’च्या संपादकीय पानावर नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, काही जणांच्या सुखासीन जीवनशैलीसाठी जे देश विकासाच्या पहिल्याच पायरीवर आहेत त्यांची संधी संपून जायला नको.
आमच्या सामूहिक उपक्रमाचा आधार हा एकच; परंतु जबाबदाऱ्या वेगवेगळ्या विचारधारांवर आधारित हव्यात. दुसरे काही नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल.
जमिनीच्या पोटातील तेलाच्या वापराने समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या देशांना मोदी यांनी कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे, असे आवाहन केले. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील विकसित देशांची तापमान दोन अंश सेल्सियसने कमी करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी पडणारा भार इतर देशांनी सारखा वाटून घ्यावा अशी भूमिका आहे व हाच मुद्दा पृथ्वीवरील उष्णता कमी करण्यासाठीच्या जागतिक करारात मोठा अडथळा ठरला आहे.
जमिनीतील तेलाच्या वापराने आधुनिक देशांनी समृद्धीच्या दिशेने आपला प्रवास अशा वेळी सुरू केला की, त्यावेळी त्याचे दुष्परिणाम काय असतील याची जाणीवच मानवाला नव्हती, असे काही जणांचे म्हणणे असल्याचे मोदींनी या लेखात म्हटले.