मोदी-शरीफ एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी
By Admin | Published: September 22, 2015 10:33 PM2015-09-22T22:33:35+5:302015-09-22T22:33:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ पुढील आठवड्यात येथील एकाच हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहेत.
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ पुढील आठवड्यात येथील एकाच हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहेत. एकाच हॉटेलातील वास्तव्यामुळे उभय नेत्यांची भेट होईल का यावरून सध्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोदी व शरीफ संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी अमेरिकेत येत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी बुधवारी सायंकाळी येथे दाखल होत असून ते वाल्डोर्फ अॅस्टोरिया हॉटेलमध्ये उतरणार आहेत. शरीफ २५ सप्टेंबरला सायंकाळी पोहोचतील व त्यांचेही वास्तव्य याच हॉटेलमध्ये असेल. दोन्ही नेत्यांची बैठक होणार असल्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, गमतीची बाब अशी की, दोन्ही नेते एकाच हॉटेलात वास्तव्य करणार आहेत. हॉटेलमध्ये ते समोरासमोर येऊ शकतात. मोदी २५ सप्टेंबर रोजी शाश्वत विकास शिखर संमेलनाला मार्गदर्शन करतील. या संमेलनाचे यजमानपद संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून भूषवित आहेत. या संमेलनात नवा विकास कार्यक्रम स्वीकारला जाणार आहे. दरम्यान, शरीफ मंगळवारी अमेरिकेला रवाना झाल्याचे रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)