मोदी-शरीफ भेटीत ‘काश्मीर’ नाही !
By admin | Published: July 11, 2015 01:38 AM2015-07-11T01:38:58+5:302015-07-11T01:38:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची शुक्रवारी सकाळी रशियात उफा येथे भेट झाली पण त्यावेळी झालेल्या चर्चेेत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची शुक्रवारी सकाळी रशियात उफा येथे भेट झाली पण त्यावेळी झालेल्या चर्चेेत दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे राहण्यास कारणीभूत असलेल्या काश्मीरचा मात्र समावेश नव्हता.
या भेटीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनातही काश्मीरचा उल्लेख नाही किंवा भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर व पाकचे समपदस्थ अजीज अहमतद चौधरी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतही काश्मीर प्रश्नाचा कोणताही विषय निघाला
पाच कलमी निवेदन
मोदी शरीफ बैठकीनंतर दोन्ही नेत्यानी एक संयुक्त निवेदन जाहीर केले असून त्यात पाच महत्वाच्या मुद्यांची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई हल्ल्याच्या पाकिस्तानातील खटल्याला वेग देण्याची गरज आहे. भारताने आणखी आवाजाचे नमुने द्यावेत अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. मुंबई हल्ल्याचा खटला पाकिस्तानात अत्यंत मंद गतीने सुरु आहे, या हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लखवी यालाही सोडून देण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारने लखवीविरोधात पुरावे न दिल्यामुळे न्यायालयाने लखवीला जामीन दिला आहे.
मोदी यांनी पाकिस्तानला येण्याचे नवाज शरीफ यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. २०१६ साली सार्क परिषदेला मोदी उपस्थित राहतील. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पाक भेटीनंतर १२ वर्षानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला भेट देत आहेत. दक्षिण अशियात शांतता प्रस्थापित करुन या भागाच्या विकासाला प्राधान्य देणे ही दोन्ही देशांची जबाबदारी असल्याचे मोदी व शरीफ यांनी मान्य केले असून, त्यासाठी दोन्ही देशाातील प्रश्नांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे.
काश्मीरमधून स्वागताचा सूर
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भारत- पाक चर्चा सुरू झाल्याचे स्वागत केले आहे. निष्पत्तीसाठी चर्चा दीर्घ काळ सुरू राहील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपीने चर्चेचे स्वागत केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
---------------
पाकिस्तानात पंतप्रधानांवर टीका
इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात झालेल्या वाटाघाटींचे प्रथम स्वागत केल्यानंतर, पाकिस्तानी नागरिक व माध्यमे या चर्चेत काश्मीरचा उल्लेख न केल्याबद्दल शरीफ यांच्यावर टीका करीत आहेत.
शरीफ व मोदी यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात काश्मीर मुद्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या निवेदनात काश्मीरचा उल्लेख झालाच पाहिजे होता असे पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.