मोदी-शरीफ यांचे हात हलवून अभिवादन

By admin | Published: September 29, 2015 11:10 PM2015-09-29T23:10:34+5:302015-09-29T23:10:34+5:30

अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ यांची अनौपचारिक बैठक होईल की केवळ हस्तांदोलन याबाबत अनेक दिवसांपासून सुरू

Modi-Sharif's hand greeted and greeted | मोदी-शरीफ यांचे हात हलवून अभिवादन

मोदी-शरीफ यांचे हात हलवून अभिवादन

Next

संयुक्त राष्ट्र : अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ यांची अनौपचारिक बैठक होईल की केवळ हस्तांदोलन याबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कानंतर उभय नेते मंगळवारी समोरासमोर आले; परंतु त्यांची ना भेट झाली ना हस्तांदोलन. केवळ औपचारिकता म्हणून त्यांनी हात हलवून एकमेकांना अभिवादन केले एवढेच.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यजमान असलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संरक्षण शिखर परिषदेत हे नेते एकत्र आले. मोदी सर्वप्रथम चेंबर हॉलमध्ये आले. त्यानंतर काही मिनिटांनी शरीफ आले. कार्यक्रम सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी शरीफ यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाहून हात हलवला. ते पाहून मोदींनी स्मित करीत हात हलवून त्यांना प्रतिसाद दिला. थोड्या अवकाशानंतर मोदींनी शरीफ यांच्याकडे पाहून पुन्हा हात हलविला. त्यावर शरीफ यांनी स्मित करीत शिर हलवून त्यांना प्रतिसाद दिला. हे वगळता उभय नेत्यांत कोणताही संवाद झाला नाही.




दोन्हीही नेते परिषद सुरू होण्याच्या काही मिनिटेच आधी सभागृहात पोहोचले होते. त्यांनी आपापले स्थान ग्रहण केले व त्यानंतर ते जागेवरून उठले नाही. सभागृहामध्ये उपस्थित इतर नेत्यांनाही भेटण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. दोघांनीही एकमेकांच्या भाषणानंतर टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. शरीफ यांच्या बाजूकडे ओबामा, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, रवांडा व इथियोपियाचे नेते बसले होते, तर मोदींच्या बाजूकडे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून, जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे, तसेच फ्रान्स व इंडोनेसियाचे नेते बसलेले होते. मोदी आणि शरीफ सुमारे दीड तास सभागृहात होते. परिषदेला संबोधित केल्यानंतर मोदी लगेचच सभागृहातून बाहेर पडले. ते हस्तांदोलन करण्यासाठी एकाही नेत्याकडे गेले नाहीत. मोदी यांच्यानंतर १० ते १५ मिनिटांनी शरीफ यांनी सभागृह सोडले.
-----------
ओबामा चुकून म्हणाले, राष्ट्रपती मोदी
न्यूयॉर्क : अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर संयुक्त निवेदन देताना मोदींचा चुकून ‘राष्ट्रपती मोदी’ असा उल्लेख केला. ओबामांचा हा व्हिडिओ व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आला आहे.
----------
काश्मीर भारत-पाकचा द्विपक्षीय मुद्दा- ओबामा
दहशतवादाविरुद्ध लढण्याची वेळ
न्यूयॉर्क : दहशतवादी ही जागतिक समस्या असून यातून कोणताही देश सुटू शकत नाही. या धोक्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजूट होऊन लढण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांना सांगितले. ओबामांसोबतच्या बैठकीत मोदी यांनी हे मत व्यक्त केले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना काश्मीर हा भारत-पाकिस्तानचा मुद्दा असून त्यांनी स्वत:च त्यावर तोडगा काढल्यास सर्वांनाच आनंद होईल असे ओबामांनी म्हटल्याचे सांगितले. न्यूयॉर्क : काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असून तो भारत आणि पाकिस्ताननेच सोडवायचा असल्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या चर्चेत मान्य केले.
-----------
संयुक्त राष्ट्र : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सीरियाच्या संकटावर चर्चा केली. तथापि, सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या भूमिकेबाबत मात्र या नेत्यांमध्ये सहमती दिसून आली नाही.ओबामा यांनी तत्पूर्वी सीरियातील नेते हे मुलांची हत्या करणारे हुकूमशाह असल्याची टीका केली. मात्र, पुतीन यांनी असद यांचे समर्थन केले पाहिजे अशी भूमिका मांडली. या देशात कारवाईदरम्यान प्रसंगी हवाई हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पुतीन म्हणाले.
-----------
मोदी मायदेशी रवाना
न्यूयॉर्क : आयर्लंड व अमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मायदेशी रवाना झाले. माझ्या अमेरिका दौऱ्याने आमच्या संबंधांची विलक्षण विविधता व सखोलता दर्शविली. या काही दिवसांत खूप काम होऊ शकले, असे टष्ट्वीट मोदींनी मायदेशी रवाना होण्यापूर्वी केले.

Web Title: Modi-Sharif's hand greeted and greeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.