अमेरिकेत मोदींचे जोरदार स्वागत; पंतप्रधान म्हणाले, जगातील भारतीय समाज हीच आमची शक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 01:39 PM2021-09-24T13:39:41+5:302021-09-24T13:41:06+5:30
विदेशांत गेल्यावर मोदी हे तेथील भारतीयांशी मोठ्या समारंभात संवाद साधतात. या भेटीत मात्र कोविड-१९ परिस्थितीमुळे तसा संवाद साधला जाणार नाही.
वॉशिंग्टन : वेगवेगळ्या कारणांनी जगात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. मोदी यांचे अमेरिकेच्या भेटीवर बुधवारी सायंकाळी येथे आगमन झाल्यावर भारतीय-अमेरिकनांच्या गटांनी त्यांचे विमानतळावर खूप उत्साहात स्वागत केले. नंतर मोदी यांनी हॉटेलमध्ये भारतीय सदस्यांशी संवाद साधला.
“वॉशिंग्टन डीसीमध्ये माझे उत्साहात स्वागत झाल्याबद्दल मी भारतीय समुदायाचा ऋणी आहे. हा समाज हीच आमची शक्ती आहे,” असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले.
भारतीय-अमेरिकन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेची छायाचित्रेही त्यांनी ट्विटरवर टाकली. “संपूर्ण जगात भारतीय स्थलांतरितांनी आपले वैशिष्ट्य निर्माण केले आहे,” असे मोदी म्हणाले.
विदेशांत गेल्यावर मोदी हे तेथील भारतीयांशी मोठ्या समारंभात संवाद साधतात. या भेटीत मात्र कोविड-१९ परिस्थितीमुळे तसा संवाद साधला जाणार नाही. मोदी हे भारतीय-अमेरिकनांमध्ये खूप लोकप्रिय असून, अमेरिकेच्या लोकसंख्येत हे प्रमाण १.२ टक्के आहे. अमेरिकेच्या राजकारणासह अनेक क्षेत्रांत भारतीय हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. माझा हा अमेरिकेचा दौरा उभय देशांत कॉम्प्रेहेन्सिव्ह ग्लोबल स्ट्रटेजिक पार्टनरशिप बळकट करणे आणि जपान व ऑस्ट्रेलियाशी संबंध घट्ट करण्याची संधी आहे, असे मोदी म्हणाले.
हॅरिस यांच्यासोबत होणार चर्चा
अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच भेट असेल. ‘द लॉस एंजेलिस टाइम्स’ने मोदी-हॅरिस भेट अमेरिकेतील भारतीय समुदायासाठी महत्त्वाचा क्षण असेल, असे म्हटले आहे. हॅरिस यांनी ३ जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. मोदी आणि हॅरिस यांची प्रत्यक्ष होणारी पहिली भेट असेल.
सुरक्षा भागिदारीत भारताचा समावेश नाही
- ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्याशी नुकत्याच करण्यात आलेल्या सुरक्षा भागीदारीत भारत किंवा जपानला समाविष्ट करून घेण्याची शक्यता अमेरिकेने फेटाळून लावली आहे.
- १५ सप्टेंबर रोजी अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी त्रिपक्षीय सुरक्षा आघाडीची (एयूकेयूएस) घोषणा केली. यामुळे ऑस्ट्रेलियाला अण्वस्रधारी पाणबुडीची तुकडी मिळणार आहे.