मोदींसोबत सकारात्मक चर्चा, ते योग्य तोच निर्णय घेतील : ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 09:47 IST2025-01-29T09:47:14+5:302025-01-29T09:47:34+5:30
सोमवारी मोदी-ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे ‘व्हाइट हाउस’ने म्हटले आहे

मोदींसोबत सकारात्मक चर्चा, ते योग्य तोच निर्णय घेतील : ट्रम्प
वॉशिंग्टन : अमेरिकेतील अवैध प्रवाशांबाबत कठोर भूमिका घेतलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य तोच निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मंगळवारी विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य केले.
फेब्रुवारी महिन्यात मोदी व्हाइट हाउसला भेट देण्याची शक्यता असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. सोमवारी मोदी-ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे ‘व्हाइट हाउस’ने म्हटले आहे. या चर्चेत द्विपक्षीय व्यापारविषयक संबंधांसह इतर क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने दोनही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
मैत्रीतून वाढेल व्यापार
व्हाइट हाउसनुसार, मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीतून एक धोरणात्मक सहकार्याचा भक्कम सेतू दोन्ही देशांत उभारला जाईल. शिवाय भारतही अमेरिकेकडून सुरक्षा उपकरणांची खरेदी वाढवण्यासह द्विपक्षीय सहकार्यावर भर देईल.
क्वाडमधून चीनला आव्हान
व्हाइट हाउसनुसार, अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया सदस्य देश असलेल्या इंडो-पॅसिफिक देशांच्या ‘क्वाड’ संघटनेची भूमिका भारत-अमेरिका संबंधांत महत्त्वाची ठरणार असून, या वर्षाच्या अखेरीस ‘क्वाड’ परिषद भारतात होत आहे.
चीनचा या भागातील वाढता प्रभाव पाहता हे क्वाड देश परस्पर सहकार्य वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर
ट्रम्प-मोदी संबंध महत्त्वाचे ठरणार आहेत.
मोदी-ट्रम्प मैत्रीपर्व
सप्टेंबर २०१९ मध्ये ह्युस्टनमध्ये आणि फेब्रुवारी २०२० मध्ये अहमदाबाद येथे या दोन्ही नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या. २०२४ मध्ये विजयानंतर जगातील ज्या तीन प्रमुख नेत्यांशी ट्रम्प यांनी चर्चा केली त्यात मोदी यांचा समावेश होता. व्यापाराच्या क्षेत्रात अमेरिका हा देश भारताचा सर्वात मोठा भागिदार असून या दोन्ही देशांत २०२३-२४मध्ये ११८ अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता.
असा ठरेल योगायोग
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी शेवटचा परदेश दौरा भारताचा केला होता. आता मोदी फेब्रुवारीत अमेरिका दौऱ्यावर गेले तर ट्रम्प यांच्या नव्या कार्यकाळात मोदींचा हा पहिला अमेरिका दौरा ठरेल.
भारताला चिंता कशाची?
निवडून येताच ट्रम्प यांनी ‘ब्रिक्स’ देशांवर १०० टक्के शुल्क लागू करण्याची घोषणा केली होती. उभरत्या अर्थव्यवस्थांचा समूह असलेल्या या संघटनेत भारत, चीन, रशिया, ब्राझील यांचा समावेश आहे. त्यामुळे अमेरिकेने लागू केलेल्या शुल्काचा फटका भारताला बसू शकतो.
स्थलांतरितांचा प्रश्न भारताच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे. कारण, लाखो भारतीय अमेरिकेत विविध क्षेत्रांत कार्यरत असून, ट्रम्प यांच्या कठोर धोरणाचा फटका यातील बऱ्याच भारतीयांना बसू शकतो.