मोदींनी जिंकली सिलीकॉन व्हॅली; सॅन होजेमधील भाषणाला भारतीयांची दाद
By admin | Published: September 28, 2015 11:51 PM2015-09-28T23:51:51+5:302015-09-28T23:51:51+5:30
संयुक्त राष्ट्राने (युनो) ७० वर्षांत दहशतवादाची व्याख्या न केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी खेद व्यक्त केला.
सॅन होजे : संयुक्त राष्ट्राने (युनो) ७० वर्षांत दहशतवादाची व्याख्या न केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी खेद व्यक्त केला. साधी व्याख्या करायला एवढा वेळ लागत असेल तर त्याच्या निपटाऱ्याकरिता किती वर्षे लागतील, असा सवाल करत मोदींनी युनोलाही दणका दिला.
मानवतेवर विश्वास असणाऱ्या देशांनी एकजूट होऊन दहशतवादाविरुद्ध लढा देण्याचे आवाहनही त्यांनी केले. मोदी ‘सॅप’ सेंटर येथे आयोजित भारतीय समुदायापुढे बोलत होते.
२१ वे शतक भारताचे - मोदी
२१ वे शतक हे भारताचे शतक आहे. १२५ कोटी देशवासीयांची बांधिलकी आणि संकल्पामुळे गेल्या १६ महिन्यांत जगाच्या भारताविषयीच्या दृष्टिकोनात नाट्यमय बदल झाला आहे.
भ्रष्टाचाराशी मूक लढा
भ्रष्टाचाराविरुद्ध आपण मूक आघाडी कशी उघडली हे सांगताना ते म्हणाले की, बनावट गॅस जोडण्या खंडित करण्यासाठी आधारकार्डची मदत घेतली. यामुळे पाच कोटी बनावट जोडण्या खंडित झाल्या.
शीख संघटनेची निदर्शने
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या येथील कार्यक्रमस्थळी फुटीरवादी शीख संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण निदर्शने केली. बॅनर फडकविण्यासाठी त्यांनी एक हेलिकॉप्टरही भाडेतत्त्वावर घेतले होते. (वृत्तसंस्था)
-------
सोशल मीडियात प्रचंड सामर्थ्य; चुकीचा निर्णय घेण्यापासून सरकारला रोखू शकते
सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे फेसबुकच्या मुख्यालयाला भेट दिली. सोशल मीडियात प्रचंड ताकद असून एखादा चुकीचा निर्णय घेण्यापासून सोशल मीडिया सरकारला रोखू शकतो आणि सकारात्मक निर्णयासाठी प्रवृत्त करू शकतो, असे मतही मोदी यांनी व्यक्त केले.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत कंपनीच्या मुख्यालयात प्रश्नोत्तराच्या तासात मोदी यांनी मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले की, सोशल मीडियाने माझ्या विचार प्रक्रियेत मोठा बदल झाला आहे.
मोदी-झुकेरबर्ग : फेस टू फेस
सोशल मीडिया शासन आणि नागरिक यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते का, असा प्रश्न मार्क झुकेरबर्ग यांनी उपस्थित केला असता मोदी म्हणाले की, सरकार आणि सामान्य नागरिक यांच्यात मोठी दरी आहे आणि या नागरिकांबद्दल विचार करतानाच पाच वर्षे निघूनही जातात. मात्र, सोशल मीडियाची ताकद ही आहे की, आपल्याला चूक आणि बरोबर काय आहे हे तात्काळ समजते.