जगभरातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदी १५ वे
By admin | Published: November 6, 2014 09:50 AM2014-11-06T09:50:44+5:302014-11-06T09:50:44+5:30
जगभरातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला असून या यादीत मोदी १५ व्या स्थानावर आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. ६ - जगभरातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला आहे. या यादीत मोदी १५ व्या स्थानावर असून त्यांच्याशिवाय मुकेश अंबानी, लक्ष्मी मित्तल तसेच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचादेखील या यादीत समावेश करण्यात आला आहे.
एका ख्यातनाम मासिकाने २०१४ मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. या यादीत ७२ जणांचा समावेश आहे. रशिचाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले असून या यादीत ते अव्वल स्थानावर आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अनुक्रमे दुस-या आणि तिस-या स्थानावर आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रथमच या यादीमध्ये स्थान देण्यात आले असून ते जगातील १५ वे सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले आहेत. 'सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत यंदा भारतातील बॉलिवूडमधील रॉकस्टार नसून भारताचे पंतप्रधान मोदींना स्थान मिळाले असे या मासिकात म्हटले आहे. 'मोदी हे हिंदूराष्ट्रवादी असून त्यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना विकास कार्य केले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी घवघवीत यश मिळवत काँग्रेसप्रणीत युपीएला धूळ चारुन भाजपाला सत्तेत आणले' असे गौरवोद्गारही या लेखामध्ये काढण्यात आले आहे. रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी ३६, आर्सेलर मित्तलचे लक्ष्मी मित्तल ५७, तर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला ६४ व्या स्थानावर आहेत.