ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चीनमध्ये आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:55 AM2017-09-04T01:55:31+5:302017-09-04T06:21:03+5:30
ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी येथे आगमन झाले. सदस्य देशांमध्ये मैत्री बळकट व्हावी, यासाठी नेत्यांशी फलदायी चर्चा होऊन सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी मोदींना आशा आहे.
शियामेन (चीन) : ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी येथे आगमन झाले. सदस्य देशांमध्ये मैत्री बळकट व्हावी, यासाठी नेत्यांशी फलदायी चर्चा होऊन सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी मोदींना आशा आहे.
या दौºयात ते रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन व ब्रिक्स नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. ते इजिप्तसारख्या देशांच्या नेत्यांनाही भेटतील. चीनने इजिप्त, केनया, ताजिकिस्तान, मेक्सिको आणि थायलंड यांनाही परिषदेसाठी बोलाविले आहे. तब्बल ७३ दिवस चीनबरोबर भारताचा डोकलाम येथे वाद सुरू होता. तो मिटल्यानंतर मोदी यांचा हा शिखर परिषदेसाठीचा प्रथमच चीन दौरा आहे. ब्रिक्सबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, ‘या शिखर परिषदेनिमित्त नेत्यांना द्विपक्षीय पातळीवर भेटण्याची संधी आहे.’ ब्रिक्सच्या भूमिकेला भारताच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. प्रगती आणि शांततेसाठी ब्रिक्स देशांच्या स्थापन झालेल्या भागीदारीने दुसºया दशकात प्रवेश केला आहे.
संपूर्ण जगाला भेडसावत असलेल्या आव्हानांना तोंड देण्यास आणि जगात शांतता व सुरक्षा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ब्रिक्सची भूमिका महत्त्वाची असल्याचे मोदी म्हणाले होते. ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबरच माझी इतर नऊ देशांच्या नेत्यांशीही चर्चा होईल, अशा अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
५ सप्टेंबर रोजी ब्रिक्स परिषद होत असून, ती चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी उगवती बाजारपेठ आणि विकसनशील देशांशी संवाद यासाठी आयोजित केली आहे. मोदी व जिनपिंग यांची मंगळवारी द्विपक्षीय भेट होण्याची अपेक्षा आहे.