यूएईमध्ये मोदींचा डंका
By admin | Published: August 18, 2015 02:29 AM2015-08-18T02:29:25+5:302015-08-18T02:29:25+5:30
स्व. इंदिरा गांधी यांच्यानंतर ३४ वर्षांनी अमिरातीत दाखल झालेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट अमेरिकेच्या दौऱ्यासारखीच गाजू लागली आहे.
अबु धाबी (संयुक्त अरब अमिरात) : स्व. इंदिरा गांधी यांच्यानंतर ३४ वर्षांनी अमिरातीत दाखल झालेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट अमेरिकेच्या दौऱ्यासारखीच गाजू लागली आहे. भारतातील तब्बल साडेचार लाख कोटी रुपयांच्या अफाट गुंतवणुकी हमी मिळविणाऱ्या मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या सहकार्याने दहशतवादाचा बीमोड करण्याचा नि:संदिग्ध संकल्प सोडला. या ऐक्यातून वाळवंटात दहशतवादाच्या विरोधात नवा सूर घुमला.
मोदींनी या निमित्ताने पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा देतानाच सार्कमधील इतर शेजाऱ्यांना मैत्रीची साद घातली. आशिया खंडाला नवा चेहरा देण्याच्या त्यांच्या आश्वासक आणि भविष्यवेधी भाषेने दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये जमलेल्या ५० हजारांहून भारतीयांच्या मनाला भुरळ घातली. संयुक्त अरब अमिरातीची आर्थिक शक्ती आणि भारताची श्रमशक्ती एकत्र आल्यास आगामी शतक आशियाचे राहील, अशी ग्वाही मोदींनी दिली.
गेल्या ७० वर्षांत दहशतवादाची परिभाषा ठरवू न शकलेल्या युनोत भारताने दहशतवादाविरोधात घेतलेल्या भूमिकेवर आणि युनोच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाच्या भारताच्या मागणीवर मोदींनी अमिरातीचे स्पष्ट समर्थन मिळविले. भारताकडे पाहण्याचा जगाचा बदललेला दृष्टिकोन हे ३० वर्षांनी देशाला पूर्ण बहुमताचे सरकार देणाऱ्या सव्वाशे कोटी भारतीयांचे यश आहे, असे मोदींनी आवर्जून सांगितले. ही भेट म्हणजे अमिरातीतील देश आणि भारत यांच्यातील विश्वासाचा सेतु असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
युरोपप्रमाणे सार्क देशही परस्परांशी सर्वार्थाने जोडले जाण्याची गरज मोदींनी व्यक्त केली.
-------
व्यवसायासाठी येथे आलेला प्रत्येक भारतीय आजही मातृभूमीच्या सुखदु:खात सहभागी असल्याच्या भावनिक विधानांना दुबईकर भारतीयांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. केरळच्या नववर्षाचा मल्याळममध्ये त्यांनी विशेष उल्लेख करताच उपस्थितांनी मोदींच्या नावाचा एकच गजर केला.
---------
मोदी यांनी रविवारी ऐतिहासिक शेख झायेद मशिदीला भेट देऊन आपल्या दोनदिवसीय युएई दौऱ्याचा प्रारंभ केला. विमानतळावर मोदींच्या स्वागतासाठी अमिरातीच्या शाही कुटुंबातील पाचही युवराज हजर होते.
--------
मंदिर उभारणीसाठी अमिरातीत जागा देऊ करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली.
------
मोदी म्हणाले...
भारतात ताबडतोब एक ट्रिलियन (एकावर १८ शून्ये) डॉलर गुंतवणुकीची संधी आहे.
यापूर्वीच्या सरकारांनी चांगली कामे माझ्यासाठी शिल्लक ठेवली आहेत.
अमिरातीत मिळालेला सन्मान कधीही विसरता येणार नाही.
मला मिळालेले प्रेम सव्वाशे कोटी भारतीयांचा सन्मान.
दहशतवादात वाईट आणि कमी वाईट असा भेद असूच शकत नाही.
परदेशात जादू
पंतप्रधान मोदींच्या अधिकृत सरकारी दौऱ्याच्या निमित्ताने स्थानिक भारतीयांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र भव्य खासगी समारंभ आयोजित करण्याचा जणू प्रघात पडला आहे.
न्यू यॉर्कचे मॅडिसन स्क्वेअर गार्डन, तसेच सिडनी आणि शांघायमधील जोशपूर्ण सभांची पुनरावृत्ती सोमवारी रात्री दुबईत पाहावयास मिळाली.
यूएईच्या युवराजाशी चर्चा
नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई ) युवराज शेख मोहंमद बिन जायेद अल नह्यान यांच्याशी दहशतवादविरोधी लढाई, सुरक्षा, व्यापार व परस्पर संबंध व्यूहात्मक पातळीपर्यंत वृद्धिंगत करण्याबाबत विचारविनिमय केला.
संयुक्त अरब अमिरातीची आर्थिक शक्ती आणि भारताची श्रमशक्ती एकत्र आल्यास आगामी शतक आशियाचे राहील. - नरेंद्र मोदी