अमेरिकन काँग्रेसमध्ये मोदींचा बोलबाला; स्वाक्षरी, सेल्फीसाठी उडाली खासदारांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 10:51 AM2023-06-23T10:51:14+5:302023-06-23T10:52:05+5:30
Narendra Modi in US: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले. दरम्यान, मोदींचं भाषण आटोपल्यावर अमेरिकन काँग्रेसमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले. अमेरिकन काँग्रेसला संबोधित करण्याची मोदींची ही दुसरी वेळ होती. येथे मोदींनी सुमारे एक तास भाषण दिले. हे भाषण ऐकण्यासाठी अनेक खासदार आणि भारत-अमेरिकन समुदायातील अनेक नागरिक उपस्थित होते. या संबोधनामध्ये मोदींनी विविध मुद्द्यांचा उल्लेख केला.
दरम्यान, मोदींचं भाषण आटोपल्यावर अमेरिकन काँग्रेसमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं. अनेक अमेरिकन खासदारांनी मोदींना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तसेच त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी झुंबड उडवली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वाक्षरी मागणाऱ्यांमध्ये अमेरिकन प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष केविक मेकार्थी यांचाही समावेश होता. नरेंद्र मोदींनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्याची परवानगी दिल्याबद्दल मेकार्थी यांचे आभार मानले. तर मेकार्थी यांनी ट्विट केले की, जगातील लोकशाहीच्या सर्वात महान प्रतिकांपैकी एक असलेल्या यूएस कॅपिटलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी या दोन्ही देशांमध्ये आर्थिक आि राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधामध्ये दृढता येण्याची अपेक्षा व्यक्त करतो.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्हाइट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने मोदींना भारतात मुस्लीम आणि अल्पसंख्याकांसोबत भेदभाव होत असल्याचा आरोप केला जातो. हा भेदभाव थांबवण्यासाठी तुमचं सरकार काय उपाययोजना आखत आहे, असा सवाल विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी भारतात धर्म किंवा जातीच्या आधारे कुठलाही भेदभाव केला जात नाही असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत हा लोकशाहीवादी देश आहे. भारत आणि अमेरिकेच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे. आमच्या पूर्वजांनी आम्हाला राज्यघटना दिली आहे. आमच्या लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही. जिथे मानवी मूल्यांना स्थान नाही तिथे लोकशाही असू शकत नाही. भारतात धर्म किंवा जातीच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. सरकारी योजनांचा लाभ सर्वांना दिला जातो. त्यात कुठलाही भेदभाव केला जात नाही, असे मोदींनी स्पष्टपणे सांगितले.