मोदींनी आयटी दिग्गजांसमक्ष मांडले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न

By admin | Published: September 28, 2015 02:27 AM2015-09-28T02:27:27+5:302015-09-28T02:27:27+5:30

महत्त्वांकाक्षी ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेची कल्पना जगभरातील आयटी दिग्गजांसमक्ष मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाजात अधिकाधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणण्याची ग्वाही दिली आहे

Modi's dream of 'Digital India' presented to IT giants | मोदींनी आयटी दिग्गजांसमक्ष मांडले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न

मोदींनी आयटी दिग्गजांसमक्ष मांडले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न

Next

सान जोस: महत्त्वांकाक्षी ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेची कल्पना जगभरातील आयटी दिग्गजांसमक्ष मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाजात अधिकाधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणण्याची ग्वाही दिली आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गजांच्या डाट्याबाबत गोपनीयता आणि सुरक्षितता बाळगण्याबाबत त्यांनी उपस्थितांना आश्वस्तही केले.
सिलिकॉन व्हॅलीमधील सान जोस येथे विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी(सीईओ) आयोजित रात्रीभोज कार्यक्रमात ते बोलत होते. आमची अर्थव्यवस्था आणि जीवन आता आणखी तारांनी जोडले जाणार असताना आम्ही डाट्याची गोपनीयता, सुरक्षा, बौद्धिक संपदा अधिकार आणि सायबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अ‍ॅडॉबचे सीईओ शांतनू नारायण, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला, क्वॉलकॉमचे कार्यकारी चेअरमेन पॉल जेकब्स, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई उपस्थित होते.
ई-गव्हर्नन्सवर भर
ई- गव्हर्नन्सचा अधिक प्रभावीरीत्या वापर करीत आम्ही प्रशासनात बदल घडवून आणत आहोत. अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि जनतेपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी ई-प्रशासनाचा सहभाग वाढविला जाईल. १ अब्ज सेलफोन असलेल्या भारतात मोबाईल गव्हर्नन्सच्या माध्यमातून विकासाला वास्तवात सर्वसमावेशक बनविण्याची क्षमता आहे. त्यामुळे ई गव्हर्नन्स सर्वांपर्यंत पोहोचेल, असेही मोदी म्हणाले. डिजिटल इंडियाच्या संकल्पनेमागचा विचार स्पष्ट करताना ते म्हणाले की, लोकांच्या जीवनात वेगाने बदल घडवून आणण्याचे हे सर्वात चांगले माध्यम आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ब्रॉडबँडने जोडले जाईल.आय-वेजची निर्मिती ही हाय-वेच्या निर्मितीसारखीच महत्त्वपूर्ण आहे. वायफाय सुविधा केवळ विमानतळाच्या लाऊंजपुरती सीमित राहू नये.
गुगलच्या मदतीने आम्ही अल्पावधीत ५०० रेल्वेस्थानकांना त्या कक्षेत आणणार आहोत. आम्हाला दस्तऐवजरहित काम करायचे आहे. प्रत्येक नागरिकासाठी डिजिटल लॉकरची व्यवस्था केली जाईल. आम्हाला खासगी दस्तऐवज त्याठिकाणी साठवून ठेवता येईल. अंतराळ तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या माध्यमातून १७० अप्लिकेशन्सची ओळख पटविण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील डाट्याचा २४ तासांत नव्हे तर २४ मिनिटांत निपटारा करता येईल.
अ‍ॅप्पलच्या सीईओंना भारतात उत्पादन केंद्र स्थापण्यासाठी निमंत्रण
मोदींनी अ‍ॅप्पलचे सीईओ टीम कूक यांना भारतात उत्पादन केंद्र स्थापन करण्याचे निमंत्रण दिले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अ‍ॅप्पलच्या फॉक्सकॉन या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकारांना सांगितले. अ‍ॅप्पल विकास टूल्सच्या माध्यमातून बड्या उद्योगाचा भाग बनू शकतात. चीनमध्ये या उद्योगातून १५ लाख लोकांना रोजगार देण्यात आल्याचा उल्लेखही कूक यांनी मोदींसोबत झालेल्या बैठकीत केला.जनधन योजनेत भागीदारीबाबतही मोदींनी कूक यांच्याशी चर्चा केली. अ‍ॅप्पलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात भारतासाठी विशेष स्थान आहे. स्टीव्ह जॉब्स युवावस्थेत भारतात आले होते. भारतात जे बघितले त्यापासून प्रेरणा घेतच त्यांनी अ‍ॅप्पलची सुरुवात केली होती, असेही कूक यांनी म्हटल्याची माहिती स्वरूप यांनी दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: Modi's dream of 'Digital India' presented to IT giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.