रशियाशी सामरिक भागीदारी वाढविण्यावर मोदींचा भर
By Admin | Published: July 17, 2014 12:30 AM2014-07-17T00:30:59+5:302014-07-17T00:30:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मंगळवारी रात्री येथे भेट घेऊन रशियासोबतची संरक्षण, अणु व ऊर्जा क्षेत्रांतील विशेष सामरिक भागीदारी वाढविण्यावर जोर
फोर्टालेझा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मंगळवारी रात्री येथे भेट घेऊन रशियासोबतची संरक्षण, अणु व ऊर्जा क्षेत्रांतील विशेष सामरिक भागीदारी वाढविण्यावर जोर दिला. त्याचबरोबर त्यांनी पुतीन यांना त्यांच्या आगामी भारत दौऱ्यादरम्यान कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला भेटीचे निमंत्रण दिले. भारत व रशिया संयुक्तरीत्या हा प्रकल्प उभारत आहेत.
ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांची ४० मिनिटे चर्चा झाली. उभय नेत्यांची सोमवारीच भेट होणार होती; मात्र पुतीन ब्राझीलची राजधानी ब्रासिलियातील एका कार्यक्रमात व्यग्र असल्याने ही भेट पुढे ढकलण्यात आली.
पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीत मी भारत-रशिया संबंध मजबूत करण्याविषयी बोललो. आम्ही रशियासोबतच्या मैत्रीला खूप महत्त्व देतो, असे टष्ट्वीट मोदींनी पुतीन यांची भेट झाल्यानंतर केले. अलीकडच्या निवडणुकीत मोठा विजय संपादित केल्याबद्दल पुतीन यांनी मोदींचे अभिनंदन केले. मोदींनी यापूर्वी २००१ मध्ये मॉस्कोत पुतीन यांची भेट घेतली होती. रशियासोबतच्या मैत्रीला खूप महत्त्व देतो. रशियासोबतचे आमचे संबंध काळाच्या कसोटीवर उतरलेले आहेत, असे मोदी म्हणाले. उभय देशांमध्ये स्वातंत्र्याच्या आधीपासून संबंध असल्याची त्यांनी प्रशंसा केली. रशियाने भारताला द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या सहकार्याचीही त्यांनी जोरदार प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)