इस्रायलशी संबंध सुधारण्यासाठी मोदींची भूमिका महत्त्वाची - राष्ट्रपती महमूद अब्बास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:55 AM2018-02-10T00:55:31+5:302018-02-10T00:56:04+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-याच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी स्पष्ट केले आहे की, मध्य पूर्व शांतता प्रक्रियेत भारताच्या भूमिकेबाबत आपण मोदी यांच्याशी चर्चा करणार आहोत.
रामलल्लाह (वेस्ट बँक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-याच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी स्पष्ट केले आहे की, मध्य पूर्व शांतता प्रक्रियेत भारताच्या भूमिकेबाबत आपण मोदी यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच मोदी हे पॅलेस्टाइन व इस्रायल संबंध सुधारण्यासाठी व्यासपीठ व वातावरण निर्माण करतील, अशी खात्री आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर या भागात तणाव आहे. या पार्श्वभूमीवर मोदी हे शनिवारी पॅलेस्टाइनला पोहचत आहेत. या देशाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत. ट्रम्प यांच्या जेरुसलेमवरील भूमिकेला संयुक्त राष्ट्र महासभेत आव्हान देण्यात आल्यानंतर यात भारतासहित १२८ राष्ट्रांनी विरोधात मत दिले.
राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी म्हटले आहे की, आम्ही मोदींसोबत विविध विषयांवर चर्चा करू. यात शांतता प्रक्रिया, व्दिपक्षीय संबंध, या क्षेत्रातील परिस्थिती यांचा समावेश असेल. भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय सन्माननीय देश असल्याचे सांगून ते म्हणाले की, पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्यात एक बहुपक्षीय मंच स्थापन करून त्यातून काही करार करण्यात भारताची महत्वाची भूमिका असू शकते.