मोदी यांचे ते विधान प्रक्षोभक - पाक
By admin | Published: September 26, 2016 12:38 AM2016-09-26T00:38:40+5:302016-09-26T00:52:02+5:30
पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करतोय असे प्रक्षोभक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून ‘बेजबाबदार वर्तन’ केल्याचा आरोप पाकिस्तानने रविवारी केला.
इस्लामाबाद : पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करतोय असे प्रक्षोभक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून ‘बेजबाबदार वर्तन’ केल्याचा आरोप पाकिस्तानने रविवारी केला. काश्मीर प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांचे हे विधान आमची ‘बदनामी करण्यासाठी नियोजनबद्धरित्या केलेल्या मोहिमेचा भाग आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाने निवेदनात म्हटले. मोदी
यांनी शनिवारी केरळमधील जाहीर सभेत पाकिस्तानची नालस्ती करण्याचा प्रयत्न केला, असेही
त्यात म्हटले.
काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांकडून निष्पाप आणि स्वत:चे संरक्षण करू न शकणाऱ्यांवरील अत्याचारांवरून जगाचे लक्ष दुसरीकडे खेचण्यासाठी अत्यंत निराशेतून ही कृती होत असल्याचा हा पुरावा आहे, असे पाकिस्तानने म्हटले. उरी येथे लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर मोदी यांनी शनिवारी प्रथमच जाहीरपणे पाकिस्तानवर हल्ला केला व त्यानंतर पाकिस्तानने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. १८ जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही व पाकिस्तानला जगात वेगळे पाडण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील, असे मोदी यांनी या भाषणात म्हटले होते. दहशतवाद्यांनी हे स्पष्टपणे ऐकावे की उरी हल्ला भारत कधीही विसरणार नाही व आमच्या १८ जवानांनी केलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही हे मी पाकिस्तानच्या नेतृत्वाला सांगू इच्छितो, असे मोदी त्या भाषणात म्हणाले होते.