मोदींचा अमेरिका दौरा द्विपक्षीय संबंधांचा उत्सव
By admin | Published: June 3, 2016 03:02 AM2016-06-03T03:02:18+5:302016-06-03T03:02:18+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा म्हणजे दोन देशांतील मजबूत होत असलेल्या संबंधांचा उत्सव आहे
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा म्हणजे दोन देशांतील मजबूत होत असलेल्या संबंधांचा उत्सव आहे, असे मत भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण के. सिंह यांनी व्यक्त केले आहे.
येथे पत्रकारांशी बोलताना अरुण सिंह म्हणाले की, अमेरिकेचे हे निमंत्रण म्हणजे दोन्ही देशांतील मजबूत संबंधाचा उत्सव आहे. पंतप्रधान मोदी हे ६ जून रोजी एण्ड्र्यूज स्थित ज्वाइंट एयरफोर्स बेसवर पोहोचतील, तर अमेरिकेच्या राजधानीत ते ५० तासांपेक्षा अधिक वेळ थांंबू शकतील. दरम्यान, मोदी यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमाला अद्याप अंतिम स्वरूप देणे बाकी आहे.
मोदी हे अध्यक्षांच्या अतिथिगृहात ब्लेयर हाउसमध्ये थांबण्याची शक्यता आहे. व्हाइट हाउसमध्ये या दोन नेत्यांत ७ जून रोजी चर्चा होण्याची शक्यता आहे. मोदी हे अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोससहित अमेरिकेतील कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा करतील, तर भारतात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. ८ जून रोजी मोदी अमेरिकी काँग्रेसला संबोधित करणार आहेत.
अरुण सिंह यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपल्या स्थायी सदस्यत्वासाठी अमेरिकेने समर्थन दिले आहे. या दौऱ्यात दोन्ही देश वॉशिंग्टन आणि दिल्लीत महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने वन्यजीव तस्करी व अन्य करारांचा समावेश आहे. मोदींच्या दौऱ्यापूर्वी वॉशिंग्टन हाउस आणि न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड यांच्यात कराराबाबत चर्चा सुरू आहे.