मोदींचा इराण दौरा ठरणार 'गेमचेंजर', चीन, पाकिस्तानला ठोस उत्तर
By admin | Published: May 23, 2016 12:48 PM2016-05-23T12:48:19+5:302016-05-23T14:41:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इराण दौ-यावर असून, त्यांच्या या दौ-यामध्ये छाबहार बंदर करार महत्वाचा ठरणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इराण दौ-यावर असून, त्यांच्या या दौ-यामध्ये छाबहार बंदर करार महत्वाचा ठरणार आहे. या करारामुळे पाकिस्तानच्या सागरी हद्दीचा वापर न करता अफगाणिस्तानला थेट पोहोचता येणार असून, मध्य आशियाचा मार्ग भारतासाठी खुला होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या इराण दौ-यातील दहा महत्वाचे मुद्दे
१) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्यामध्ये सोमवारी छाबहार बंदर विकसित करण्याचा ऐतिहासिक करार झाला. इराणच्या दक्षिणेला गल्फ ऑफ ओमानमधील छाबहार महत्वाचे बंदर आहे. भारतासाठी रणनितीक दृष्टीकोनातून हे महत्वाचे बंदर आहे. भारत आणि इराणमध्ये एकूण १२ करार झाले.
२) या बंदरामुळे अफगाणिस्तानात आणि मध्य आशियात जाण्यासाठी पाकिस्तानच्या सागरी हद्दीतून जाण्याची गरज उरणार नाही. रस्ते आणि समुद्र मार्गे इराणहून अफगाणिस्तानात जात येईल.
३) छाबहार बंदराच्या विकासासाठी भारत मदत करणार असून, भारत या बंदराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात वीस कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
४) दुस-या टप्प्यात छाबहार आणि झाहीदानमध्ये ५०० कि.मी. रेल्वे जाळे उभारण्याची भारताची योजना आहे.
५) पाकिस्तानने आपल्या हद्दीतून अफगाणिस्तानला मालवाहतूक करण्याची भारताला परवानगी दिलेली नाही.
६) चीन आणि पाकिस्तानमधील वाढत्या रणनितीक भागीदारीच्या दृष्टीनेही छाबहार बंदर करार महत्वाचा आहे. चीन पाकिस्तानमधील ग्वादर बंदर विकसित करत आहे. पाकिस्तानातील ग्वादर बंदर छाबहारपासून फक्त ७२ कि.मी. अंतरावर आहे.
७) आंतरराष्ट्रीय समुदायाने चार महिन्यांपूर्वी इराणवरील आर्थिक निर्बंध हटवल्यानंतर मोदी इराण दौ-यावर गेले आहेत. मागच्या पंधरा वर्षात इराण दौ-यावर जाणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
८) व्दिपक्षीय व्यापार, ऊर्जा सुरक्षा आणि दळणवळण हे मोदींच्या दौ-यातील महत्वाचे उद्देश आहेत, ते इराणमध्ये भारतीय सांस्कृतिक महोत्वसाचे उदघाटन करणार आहेत.
९) भारत इराणकडून तेल आयात दुपट्टीने वाढवण्याचा विचार करत आहे.
१०) मोदींच्या दौ-यापूर्वी भारताने इराणचे बाकी असलेले ६.४ अब्ज डॉलरचे तेल बिल अदा केले.