कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत पदावर राहणार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:12 IST2024-12-11T17:09:01+5:302024-12-11T17:12:54+5:30

Mohamed al-Bashir, Syria New PM: पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बशीर यांनी देशात शांतता, सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले

Mohamed al-Bashir appointed caretaker Syria PM till March 2025 all you need to know about him | कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत पदावर राहणार, जाणून घ्या...

कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत पदावर राहणार, जाणून घ्या...

Mohamed al-Bashir, Syria New PM: सीरियात बशर अल-असद यांची सत्ता उलथून टाकल्यानंतर हयात तहरीर अल-शाम (Hayat Tahrir Al-Sham - HTS) ने मोहम्मद अल-बशीर यांची हंगामी सरकारचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. ते मार्च २०२५ पर्यंत सरकारचा कार्यभार सांभाळतील. देशात नवीन सरकार स्थापन करण्याची जबाबदारी मोहम्मद यांच्या खांद्यावर आहे. सध्या ते जुन्या सरकारच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन अंतर्गत सरकार स्थापन करण्यात व्यस्त आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बशीर यांनी देशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अमेरिकेने अद्याप बशीरला दहशतवादी संघटनेच्या यादीतून हटवलेले नाही.

कोण आहेत नवे पंतप्रधान मोहम्मद अल बशीर?

हयात तहरीर अल-शामचे महत्त्वाचे सदस्य मोहम्मद अल-बशीर हे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. २०११ मध्ये गृहयुद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांनी गॅस प्लांटमध्ये काम केले होते. जानेवारीमध्ये बशीर यांची सॅल्व्हेशन गव्हर्नमेंट (SG) चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे सरकार HTS ने आपल्या ताब्यातील क्षेत्र चालवण्यासाठी स्थापन केले होते. अल-बशीरचा जन्म १९८३ मध्ये इदलिब गव्हर्नरेटच्या झाबल जाविया प्रदेशात असलेल्या मशौन गावात झाला. त्यांनी २००७ मध्ये अलेप्पो विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली आणि नंतर गॅस प्लांटमध्ये काम केले. या आठवड्यापूर्वीपर्यंत, मोहम्मद अल-बशीर हे सिरियातील इडलिब आणि अलेप्पो सारख्या एचटीएस-वर्चस्व क्षेत्राबाहेर फारसे परिचित नव्हते. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये बशीर प्रथमच इडलिबच्या बाहेर दिसले. त्यावेळी ते अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक भेटी घेताना दिसले.

सिरियातून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

सीरियातील बशर अल असाद यांचे सरकार हयात तहरीर अल शाम संघटनेने उलथवून लावल्याने गोंधळ माजला. अचानक झालेल्या या उलथापालथीमुळे अनेक परदेशी नागरिक सीरियात अडकले. यात भारतीयांचाही समावेश होता. ७५ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली. भारताने मंगळवारी (१० डिसेंबर) सीरियात अडकलेल्या ७५ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. हयात तहरीर अल शामच्या बंडखोरांनी बशर अल असाद यांच्या सरकार हटवल्याच्या दोन दिवसांनी ही गोष्ट घडली.

Web Title: Mohamed al-Bashir appointed caretaker Syria PM till March 2025 all you need to know about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.