दोरीवरच्या उड्या आणि करोडोंची कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 06:30 AM2022-05-07T06:30:38+5:302022-05-07T06:38:38+5:30
कोरोनाकाळानं अनेकांचं होत्याचं नव्हतं झालं. अनेक जीव तर गेलेच; पण अनेकांना आपल्या नोकऱ्यांवर पाणी सोडावं लागलं.
कोरोनाकाळानं अनेकांचं होत्याचं नव्हतं झालं. अनेक जीव तर गेलेच; पण अनेकांना आपल्या नोकऱ्यांवर पाणी सोडावं लागलं. त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. याच काळात काही मोजक्या उद्योगांनी आणि उद्योजकांनी पाण्यासारखा पैसा कमावला, हेही खरं; पण असे मोजके फारच थोडे होते. सर्वसामान्य माणसांना तर जगणंही अशक्य झालं. जगभरात कोणीही त्यातून सुटू शकलं नाही. पण कोरोनाकाळानं जसं काही जणांचं उखळ पांढरं केलं, तसंच इंग्लंडमधील एका तरुणीलाही कोरोना पावला! मात्र त्याआधी अनेक संकटांतून तिला जावं लागलं. अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि अर्थातच तिला नोकरीवरूनही काढून टाकण्यात आलं होतं.
तीस वर्षीय या तरुणीचं नाव आहे लॉरेन फ्लायमन. इंग्लंडच्या सेंट अल्बान्स इथं ती राहते. एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून ती काम पाहत होती. तिच्या कामाच्या स्वरूपामुळे तिला वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्याव्या लागत असत. लोकांशी प्रत्यक्ष संपर्क ठेवावा लागत होता आणि अर्थातच त्यासाठी खूप सारा प्रवासही करावा लागत असे; पण कोरोना काळात सगळ्याच ठिकाणी लॉकडाऊन लागले. लोकांचं हिंडणं-फिरणं बंद झालं आणि प्रत्यक्ष संपर्क तर बंदच झाला. या साऱ्या गोष्टींमुळे कंपनीच्या दृष्टीनं लॉरेनची उपयोगिताही पूर्णपणे संपली आणि तिला तत्काळ नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.
आता काय करायचं म्हणून लॉरेननं काही छोट्या-मोठ्या गोष्टी करून पाहिल्या, पण त्यात तिला रस वाटला नाही. फिटनेस राहावा म्हणून आधी ती जीममध्ये जायची. तिथे व्यायाम आणि दोरीवरच्या उड्या मारायची. कोरोनामुळे जीमही बंद झालं आणि तिला स्वत:ला घरात चार भिंतीत कोंडून घ्यावं लागलं; पण घरात मात्र फिटनेससाठी दोरीवरच्या उड्या मारणं तिनं सुरूच ठेवलं. काही दिवसांनी ती एका ‘जम्पिंग रोप क्लब’मध्ये सामील झाली. म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणं आवडणाऱ्या एका ऑनलाइन ग्रुपची ती सदस्य झाली.
तिथे तिनं दोरीवरच्या उड्या मारण्याचे वेगवेगळे प्रकार शिकून घेतले. घरीही बरीच प्रॅक्टिस केली. स्वत:ही वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. त्यात ती इतकी पारंगत झाली की, एखादी जिम्नॅस्ट जितक्या सहजपणे अतिशय कठीण अशा कसरती करते, त्याप्रमाणे अत्यंत अवघड अशा उड्या ती सहजपणे मारू लागली. शिवाय त्यात एक लय होती, ताल होता, एखादं सुंदर नृत्य पाहावं तशा तिच्या या साऱ्या कसरती होत्या.
दोरीवरच्या या उड्यांचे प्रकार लॉरेन सोशल मीडियावरही शेअर करायला लागली, त्याचे व्हिडिओ टाकायला लागली. अल्पावधीत हे व्हिडिओ व्हायरल झाले आणि ती एक ‘स्टार’ झाली. तिचे व्हिडिओ चाहत्यांनी खूपच उचलून धरले आणि सगळ्यांच्या तोंडी तिचं नाव झालं. इतकं की अनेक कंपन्यांनी तिला आपला ब्रॅण्ड ॲम्बेसॅडर म्हणून मोठमोठ्या रकमेच्या ऑफर दिल्या. त्यात फिटनेस कंपन्यांचा वाटा खूपच मोठा होता. काही महिन्यांपूर्वी जिची खाण्याची मारामार होती, ती आता अक्षरश: मालामाल झाली!
आपल्या आवडीचं रूपांतर लॉरेननं ‘व्यवसाया’साठी केलं आणि ती मोठी सेलिब्रिटी बनली. तिच्या दोरीवरच्या उड्या पाहण्यासाठी लोक अक्षरश: वेडे होतात. त्यामुळे अक्षरश: काही दिवसांत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटचे फॉलोअर्सही दहा लाखांच्या पुढे गेले! लॉरेन सांगते, खरोखर काही दिवसांपूर्वी मी कोणीही नव्हते आणि आता जगभरात माझे इतके चाहते आहेत की, माझं मलाच आश्चर्य वाटतं. केवळ एक दोरी माझ्या आयुष्याची दोरी इतकी बळकट करील आणि माझं भाग्य बदलून टाकेल, असं स्वप्नातही मला वाटलं नव्हतं. मला अजूनही वाटतं, मी स्वप्नातच आहे की काय!
नोकरी गेल्यानं लॉरेनचं सुरळीत चाललेलं आयुष्यच पार बदलून गेलं होतं. हाती काहीच उरलं नसल्यामुळे, कुठे बाहेरही जाता येत नसल्यानं आपलं लग्नही तिला पुढे ढकलावं लागलं होतं; पण आता घरबसल्या ती हजारो डॉलर कमावते. आपल्या आवडीचं रूपांतर ‘पॅशन’मध्ये कसं करता येतं, याचं लाॅरेन म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे. लाॅरेन म्हणते, माझा सेल्स एक्झिक्युटिव्हचा जॉब मी आवडीनं करीत असले, तरी त्यात मला मुळात फारसा रस नव्हता. न आवडणारा जॉब करण्यात आता मला रसही नाही. करण्यासारख्या अजून अनेक गोष्टी आहेत आणि त्या मी आता करेन!
दिवसाला फक्त एक तास काम!
आधीच्या नोकरीत लॉरेनला दिवसाचा बराचसा वेळ बाहेर आणि प्रवासात घालवावा लागत होता. त्यामुळे कुटुंबाशीही तिची फारशी भेट होत नव्हती. आता मात्र सगळंच बदललं आहे. अनेक नवनव्या गोष्टी ती करते आहे. आधी दिवसातले जवळपास १५ तास ती आपल्या जॉबसाठी द्यायची. आता आठवड्यातले केवळ सहा तास (दिवसाला एक तास, रविवारी सुटी!) ती काम करते आणि लाखोंची कमाई करते!