पैसे, तेल नाही, शाळा बंद; श्रीलंकेची तिजोरी पूर्ण रिकामी, महागाई ६० टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 07:56 AM2022-07-07T07:56:20+5:302022-07-07T07:56:43+5:30
सध्या हॉस्पिटल व अन्य आपत्कालीन सेवांसाठी पेट्रोल डिझेल वापरले जात आहे. याच कारणामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोलंबो : आपला शेजारी देश श्रीलंकेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. पैशांची तिजोरी पूर्ण रिकामी झाल्याने आता पेट्रोल, डिझेल, औषधे, अन्नधान्य सगळेच संपत चालले आहे. श्रीलंकेकडे पेट्रोल डिझेल शिल्लक नसून, तेल खरेदी करण्यासाठी पैसेही नाहीत. या संकटामुळे श्रीलंकेने शाळा पुन्हा एकदा आठवडाभरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असून, लोक खाण्या-पिण्यासाठी आणि इतर आवश्यक सामानासाठी वणवण भटकत आहेत.
सध्या हॉस्पिटल व अन्य आपत्कालीन सेवांसाठी पेट्रोल डिझेल वापरले जात आहे. याच कारणामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्री यांनी अगदी स्पष्ट करून सांगितले आहे की, त्यांच्याकडे आता अगदी काही दिवस पुरेल इतकेच इंधन शिल्लक आहे. त्यांनी अन्य देशात रहात असलेल्या श्रीलंकन नागरिकांना पेट्रोल खरेदीसाठी देशात पैसे पाठवण्याचे आवाहन केले आहे.
संकट दारावर...
१९९७ च्या आशियाई आर्थिक संकटाला २५ वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुलाखतीत मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी म्हटले की, आर्थिक संकट पुन्हा एकदा आपल्यावर ओढवू शकते, कारण गोष्टी फारशा बदललेल्या नाहीत. सतर्क राहिले नाही तर सर्व आशियाई देश आर्थिक संकटात फसतील.
पगार देण्यासाठी नोटांची छपाई
श्रीलंकेची परदेशी चलनाची तिजोरी रिकामी झालीय आणि त्यांच्याकडे आयात केलेल्या वस्तूंची बिलं भरण्यासाठीही पैसे नाहीत. आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आता ते रुपयांची छपाई करत आहेत. सध्या श्रीलंकेत महागाई ६० टक्क्यांच्या पुढे पोहोचली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.
का आहेत शाळा बंद?
तेल नसल्याने गेल्या एक महिन्यापासून येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शहरी भागातही गेल्या २ आठवड्यापासून शाळा बंद असून, त्या पुढील आठवड्यात उघडण्याची शक्यता कमी आहे. सरकार वीजपुरवठा तयार करणाऱ्या यंत्रणांनाही इंधन पुरवठा करण्यास असमर्थ ठरले आहे.
भारताकडून मदतीचा हात
तेलासाठी पैसे नसल्याने श्रीलंकेने भारताकडे शेजारी देश म्हणून मदतीची याचना केली होती. त्यानंतर भारताने तत्काळ प्रतिसाद देत आतापर्यंत हजारो टन इंधन श्रीलंकेला पाठवले आहे. याचसोबत जीवनावश्यक वस्तूंची मदतही भारताकडून करण्यात येत आहे. तसेच पर्यटनासाठी भारतीय लोक येथे मोठ्या प्रमाणावर यावेत म्हणून श्रीलंकेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
पंतप्रधान काय म्हणतात...
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे संसदेत म्हणाले, आता आपण दिवाळखोर देश आहोत. त्यामुळे आयएमएफसोबत वाटाघाटी करताना आम्हाला अधिक अडचणी आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. दिवाळखोरीच्या परिस्थितीमुळे, आपल्याला आपला देश आयएमएफसमोर वेगळ्या पद्धतीने मांडावा लागला आहे, ते सध्या खूप कठीण आहे.