वानराने चोरला सिंहाचा छावा, स्वत:च्या पिलासारखी घेतेय काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 02:54 AM2020-02-06T02:54:49+5:302020-02-06T02:55:08+5:30
दक्षिण अफ्रिकेच्या क्रुगर नॅशनल पार्कमध्ये गेल्या आठवड्यात विलक्षण घटना घडली.
जोहान्सबर्ग : दक्षिण अफ्रिकेच्या क्रुगर नॅशनल पार्कमध्ये गेल्या आठवड्यात विलक्षण घटना घडली. एका नर वानराने (बबून) हातात सिंहाच्या छाव्याला झाडावर नेले व त्याची अशी काही निगा राखली की, जणू ते त्याचे अपत्य आहे, असे सफारीचे चालक कुर्ट्झ शुल्टझ यांनी सांगितले. गेल्या २० वर्षांत मी वानराचे असे वर्तन पाहिले नाही, असेही ते म्हणाले.
हे वानर त्या छाव्याची अशी काळजी घेत आहे की, जणू ते वानराचेच पिलू आहे, असे शुल्टझ यांनी सांगितले. नर वानर हे खूप नीटनेटकेपणा ठेवतात; परंतु एखादी मादी वानर तिच्या छोट्या पिलाची जी काळजी घेते तशीच काळजी या सिंहाच्या छाव्याची घेतली गेली आहे. शुल्टझ म्हणाले की, गेल्या शनिवारी मी वानरांची टोळी पाहिली. ती वानरे खूपच उत्साहात व उड्या मारताना दिसली. बहुधा त्यांना सिंहाचा छावा सापडला असावा. एका वानराने त्या छोट्या छाव्याला झाडावर नेले. सिंह आणि चित्ते शिकारीला जातात तेव्हा ते आपल्या छाव्यांना ज्या ग्रॅनाईटच्या पहाडात व मोठमोठ्या शिळा असलेल्या भागात ठेवतात तेथे वानरे जमा झालेली होती, असे सांगून ते म्हणाले, बहुधा तेथेच त्यांना तो छावा सापडला असावा.
‘वानरे ही खरोखरच दणकट प्राणी. त्या सगळ्याच वानरांमध्ये उत्साह निर्माण झाल्यावर प्रारंभी त्यांच्यात त्या छाव्यावरून भांडण झाले असावे आणि त्यातून ते जखमी झाले असावे,’ असे शुल्टझ म्हणाले. त्या सकाळी खूपच ऊन होते व छाव्याच्या अंगातील पाणी कमी झाल्याची चिन्हे दिसत होती. वानरांच्या त्या टोळीतील इतर वानरे निवांत झाल्यावर नर वानर त्या छाव्याला एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर घेऊन गेले व ते त्याची प्रदीर्घ काळ काळजीही घेत होते.
छावा फारच थकलेला दिसत होता. वानराने सिंहाच्या छाव्याची काळजी घेण्याचे दुर्मिळ दृश्य अभयारण्यात शुल्टझ व इतरांनी छायाचित्रांत टिपून घेतले. ‘तो बिचारा छावा जिवंत राहण्याची काही शक्यता दिसत नाही. वानरांची टोळी मोठी असून, सिंह काही आपल्या छाव्याला त्यांच्याकडून परत मिळवू शकणार नाही’, असे ते म्हणाले.
टोळीमध्ये भांडणेही : वीस वर्षांतील प्रथमच घटना -कुर्ट्झ शुल्टझ
‘निसर्ग अनेक वेळा क्रूर असतो आणि तो छावा सहजपणे जिवंत राहणे अवघड आहे. हा छावा मोठा मोठा होत जाईल तेव्हा तो या वानरांच्याच जीविताला धोका निर्माण करील. मी वानरांनी चित्त्यांच्या बछड्यांना फार क्रूरपणे ठार मारताना पाहिले आहे आणि वानरांनी सिंहाच्या छाव्यांना ठार मारल्याचे ऐकले आहे, असे शुल्टझ म्हणाले.