कोरोनानंतर आता मंकीपॉक्स महामारी?; WHO चा मोठा दावा, आतापर्यंत २४ देशांत पसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 03:01 PM2022-05-31T15:01:06+5:302022-05-31T15:01:47+5:30
२०२२ मध्ये आफ्रिकन देश काँगोमध्ये मंकीपॉक्समुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला होता, तर नायजेरियामध्ये या वर्षी या आजाराने पहिला मृत्यू नोंदवला गेला.
जिनेवा - जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्या आणि २४ देशात ४३५ हून अधिक रुग्ण आढळल्यानं जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनानंतर मंकीपॉक्सची जागतिक महामारीचं कारण बनू शकतं. आफ्रिकेच्या बाहेर अनेक देशात या आजाराबाबत अद्याप काही माहिती मिळू शकली नाही असं WHO नं सांगितले आहे.
अहवालात म्हटलं आहे की, कोविड 19 सारखा या विषाणूकडे पाहू नये. सर्वसामान्यांना कमी धोका आहे. 'आम्हाला लोकांनी घाबरण्यासाठी आणि हे कोविड 19 सारखे किंवा कदाचित वाईट आहे असा विचार करू नये. मंकीपॉक्स हा कोरोनासारखा नसून तो वेगळा विषाणू आहे. व्हायरसच्या अनुवांशिक स्वरूपाबद्दल आरोग्य तज्ञ स्पष्ट नाहीत असं डब्ल्यूएचओच्या संचालक सिल्वी ब्रायंड यांनी एका ब्रीफिंग दरम्यान सांगितले.
सध्याचा डेटानुसार, कोविड 19 आणि आरएनए व्हायरससारख्या इतर विषाणूंप्रमाणे ते सहजपणे प्रसारित होत नाही. मंकीपॉक्सबाबत डब्ल्यूएचओचे अधिकारी रोसामुंड लुईस यांनी सांगितले की, या क्षणी आम्हाला जागतिक महामारीची चिंता नाही. मात्र, वाढती प्रकरणे त्यांच्या चिंतेचे कारण असल्याचे त्यांनी मान्य केले. हा विषाणू प्रथम समलिंगी आणि उभयलिंगी पुरुषांमध्ये दिसून आला.
मात्र, विषाणूची व्याख्या लैंगिक संक्रमित रोग म्हणून केलेली नाही. लुईस यांनी समलिंगी पुरुषांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. लुईस म्हणाले की एकत्रितपणे, जगाला हा संसर्ग रोखण्याची संधी आहे. २०२२ मध्ये आफ्रिकन देश काँगोमध्ये मंकीपॉक्समुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला होता, तर नायजेरियामध्ये या वर्षी या आजाराने पहिला मृत्यू नोंदवला गेला. अनेक वर्षांनंतर मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव अचानक समोर आला आहे. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेला मंकीपॉक्सचा सर्वाधिक फटका बसतो.
भारतात सतर्कता
जगात कोरोनानंतर आता एक नवीन संसर्ग वेगाने पसरत आहे, ज्याचे नाव 'मंकीपॉक्स' (Monkeypox) आहे. ताज्या अहवालानुसार, आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे ४३५ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण यूके, युरोपियन देश, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह २४ देशांमध्ये आढळून आले आहेत. मात्र, भारतात अद्याप एकही केस आढळलेला नाही परंतु सतर्कता वाढली आहे. मंकीपॉक्स व्हायरसबाबत मुंबई विमानतळ आणि मुंबई महापालिका सतर्क आहे.