Monkeypox : जगातील 60 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचा धोका; WHO कडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 10:57 PM2022-07-23T22:57:38+5:302022-07-23T22:58:28+5:30
Monkeypox :मंकीपॉक्सचा धोका जागतिक स्तरावर दिसून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या प्राणघातक व्हायरसचा धोका युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक आहे.
नवी दिल्ली : मंकीपॉक्स व्हायरस जगातील 60 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. या आजाराबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेने मोठी घोषणा केली आहे. मंकीपॉक्सचा धोका जागतिक स्तरावर दिसून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या प्राणघातक व्हायरसचा धोका युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक आहे.
सध्याची परिस्थिती पाहता, त्याचा आणखी आंतरराष्ट्रीय प्रसार होण्याचा स्पष्ट धोका आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय वाहतुकीत व्यत्यय येण्याचा धोका सध्या कमी आहे. सर्व धोके लक्षात घेऊन, जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी शनिवारी सांगितले की, वेगाने पसरणारा मंकीपॉक्सचा उद्रेक जागतिक आरोग्य आणीबाणीचे प्रतिबिंबित करतो. जागतिक आरोग्य आणीबाणी ही जागतिक आरोग्य संघटनेची सर्वोच्च पातळीचा इशारा आहे. आता मंकीपॉक्सबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियेची गरज आहे. यासोबतच, लस आणि उपचार शेअर करण्यासाठी निधी आणि जागतिक प्रयत्नांची गरज आहे.
"So in short, we have an outbreak that has spread around the world rapidly, through new modes of transmission, about which we understand too little and which meets the criteria in the International Health Regulations."-@DrTedros#monkeypox
— World Health Organization (WHO) (@WHO) July 23, 2022
जिनिव्हा येथे मीडिया ब्रीफिंग दरम्यान आरोग्य आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या वर्षी आतापर्यंत 60 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सची 16,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि आफ्रिकेत या आजारामुळे 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात वेगाने पसरत असलेल्या मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव योग्य गटांमध्ये योग्य रणनीतीने रोखला जाऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटने म्हटले आहे.
तसेच, या रोगाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करत आहेत, कारण मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे प्रभावी माहिती आणि सेवा तयार करणे आणि वितरित करणे अत्यावश्यक आहे, असेही जागतिक आरोग्य संघटने म्हटले आहे.
मंकीपॉक्सची लक्षणं काय आहे?
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ व्हायरस आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याचबरोबर ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.