संकटं संपता संपेना! कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्सची चाहूल; नेमका काय आहे 'हा' व्हायरस?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 03:45 PM2022-05-09T15:45:55+5:302022-05-09T15:49:07+5:30
Monkeypox Virus : कोरोना पाठोपाठ नवनवीन व्हायरस आता डोकं वर काढत आहेत. अशीच एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
सध्या संपूर्ण जग हे कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. जगभरातील अनेक देश हे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान कोरोना पाठोपाठ नवनवीन व्हायरस आता डोकं वर काढत आहेत. अशीच एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स व्हायरस आढळून आला आहे. या व्हायरसचा प्रसार उंदरांपासून माणसांकडे होत आहे. ज्या व्यक्तीमध्ये हा व्हायरस आढळून आला तो व्यक्ती नायजेरियामधून आल्याचं समोर आलं आहे.
ब्रिटनची हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी हे प्रकरण समोर आल्यानंतर अलर्टवर आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ व्हायरस आहे आणि तो सहज पसरत नाही. या व्हायरसवर अभ्यास केला गेला आहे. त्याची लक्षणे किरकोळ आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचे रुग्ण काही आठवड्यांत बरे होऊ शकतात. तथापि, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास ते धोकादायक ठरू शकते. गेल्या वर्षी जुलैमध्ये अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका व्यक्तीमध्ये हा व्हायरस आढळून आला होता.
यूकेच्या आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे. सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून रुग्णाची प्रकृती ठीक आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. काही लोक आढळून आले आहेत, त्यांना या आजाराबाबत आवश्यक सल्ला आणि त्यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना सांगण्यात येत आहेत.
मंकीपॉक्स व्हायरस म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या मते मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ व्हायरस आहे. फ्लूचा त्रास झालेल्या व्यक्तीमध्ये त्याची लक्षणे दिसून आली आहेत. जर एखाद्याची प्रकृती जास्त बिघडली तर त्याला न्यूमोनियाचा त्रास असू शकतो. यामध्ये संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.