CoronaVirus: दिलासादायक! कोरोनाबद्दलची 'ही' आकडेवारी वाचून तुम्हालाही बरं वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 10:24 AM2020-04-10T10:24:51+5:302020-04-10T10:25:22+5:30
Coronavirus कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाखांच्या घरात; मृतांची संख्या ९५ हजार पार
वॉशिंग्टन: कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं असताना, कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. एका बाजूला अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून शेकडो जणांचे बळी जात असताना दुसरीकडे जगभरात आतापर्यंत साडे तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मृतांच्या तुलनेत बऱ्या झालेल्यांची संख्या जवळपास चौपट आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्याच्या घडीला जगातील कोरोनाबाधितांची संख्या १६ लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे ९५ हजार ७३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ३ लाख ५६ हजार ६६० इतका आहे. कोरोनाबाधितांपैकी जवळपास २२ टक्के बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा खूप जास्त असण्याची दाट शक्यता आहे. बहुतांश देशांमध्ये कोरोनाची अतिशय गंभीर असलेल्या रुग्णांनाच रुग्णालयांमध्ये दाखल केलं जातं. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये त्यांचीच गणना केली जाते.
जवळपास ८० टक्के कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून येतात. बऱ्याचशा देशात अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जातात. त्यांच्या प्रकृतीत लगेच सुधारणादेखील होते. मात्र रुग्णांचा आकडा मोजताना केवळ रुग्णालयात दाखल असलेल्यांचा विचार केला जातो. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सर्वाधिक रुग्ण बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी लक्षात घेतल्यास यामध्ये चीन आघाडीवर आहे. चीनमध्ये ७७ हजार ६७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यानंतर जर्मनी (५२,४०७), स्पेन (५२,१६५), इराण (३२,३०९) यांचा क्रमांक लागतो.