ट्विटरकडून ७० हजार अकाऊंट्स बंद; हिंसेचे समर्थन करणारे कन्टेंट करत होते शेअर
By देवेश फडके | Published: January 12, 2021 10:28 AM2021-01-12T10:28:14+5:302021-01-12T10:31:43+5:30
अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी ट्विटरने तब्बल ७० हजार युझर्सचे अकाऊंट बंद केले आहेत. ट्विटरने अधिकृतरित्या ही माहिती दिली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी ट्विटरने तब्बल ७० हजार युझर्सचे अकाऊंट बंद केले आहेत. ट्विटरवरील ही खाती QAnon संबंधित कन्टेंट सोशल मीडियावर शेअर करत होते. ट्विटरने अधिकृतरित्या ही माहिती दिली आहे.
ट्विटरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि नुकसान वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून QAnon संबंधित कन्टेंट शेअर करणारी हजारो खाती बंद केली आहेत.
More than 70,000 accounts have been suspended following the riots in Washington DC. These accounts were engaged in sharing harmful QAnon-associated content: Twitter Inc
— ANI (@ANI) January 12, 2021
अमेरिकेत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी यातील बहुतांश आंदोलकांना आरोपी करण्यात आले आहे. शिंग असलेली टोपी घातलेले डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थकांवर मुद्दामहून प्रवेश निषिद्ध असलेल्या इमारतीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणे, हिंसाचार माजवणे, संसदेचा अपमान करणे यांसारखे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे आता अमेरिकीची सूत्रे जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला होता. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार, तर अनेक जण जखमी झाले. आंदोलकांनी चार तास संसद वेठीस धरली होती.
अमेरिकी संसदेत बुधवारी मतदारवृंदाच्या मतांची मोजणी सुरू होती. या घटनात्मक प्रक्रियेत बायडेन यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मात्र, मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना ट्रम्पसमर्थकांनी संसद परिसरात गोळा होण्यास सुरुवात केली. वाढलेल्या गर्दीने एका क्षणी संसदेभोवतालचे सुरक्षा कडे तोडत संसदेच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. या तणावाच्या वातावरणात पोलीस बंदोबस्तही तोकडा पडला.