CoronaVirus News: अमेरिकेतील ९७ हजार शाळकरी मुलांना कोरोना विषाणूची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 02:18 AM2020-08-13T02:18:56+5:302020-08-13T06:50:07+5:30
शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयास पालकांकडून होतोय विरोध
वॉशिंग्टन : जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यांत अमेरिकेतील ९७ हजार शाळकरी मुलांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. अमेरिकेतील काही प्रांतांत नव्या सत्रासाठी शाळा सुरू झाल्या असून, काही प्रांतांत शाळा उघडण्याची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा अहवाल जाहीर झाल्याने पालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ या संस्थेने हा अहवाल जाहीर केला आहे. १६ जुलै ते ३0 जुलै या कालावधीत केलेल्या तपासणीत ९७ हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५ दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली असून, त्यात लहान मुलांची संख्या ३,३८,000 आहे.
अहवालात म्हटले आहे की, जुलै महिन्यात २५ मुलांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. मेपासून ८६ मुले कारोनामुळे मृत्युमुखी पडली आहेत. गेल्या आठवड्यात जॉर्जिया प्रांतात एक ७ वर्षीय मुलगा मरण पावला. हा या प्रांतातील सर्वाधिक कमी वयाचा कोरोना बळी ठरला आहे. या महिन्यातील दोन मुलांच्या मृत्यूनंतर फ्लोरिडामधील मुलांच्या मृत्यूचा आकडा ७ झाला आहे.
सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेतील शाळा मार्चपासून बंद आहेत. अशा १३ हजार शाळांच्या अधिकाऱ्यांवर मुलांना पुन्हा शाळेत आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युओमो यांनी सांगितले की, शुक्रवारपासून एनवायसीमधील शाळा पुन्हा सुरू होत आहेत.
विद्यापीठे, महाविद्यालयेही होणार सुरू; जमावबंदीसह कडक नियम
अमेरिकेतील काही विद्यापीठे आणि महाविद्यालयांनीही प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. कॅम्पसमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांना कोरोना तपासणीची सक्ती केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे मास्क घालणे आणि शारीरिक अंतर राखणे यासारखे नियमही करण्यात आले आहेत. कॅम्पसमध्ये १५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.
शैक्षणिक संस्थांच्या या निर्णयास काही नागरिकांनी विरोध चालविला असून, सार्वजनिक सुरक्षेपेक्षा नफेखोरीला महत्त्व देण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली जात आहे.
न्यू ओर्लियन्समधील खाजगी विद्यापीठ ‘ट्युलेन युनिव्हर्सिटी’ १९ आॅगस्टपासून सुरू होत आहे. या विद्यापीठात १३ हजार विद्यार्थी आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शहरातील एका हॉटेलात उभारण्यात आलेल्या ‘आगमन केंद्रा’त दोन दिवस थांबून कोविड-१९ तपासणी करून घ्यावी लागणार आहे.