VIDEO: इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले; कमांडर सुलेमानींच्या हत्येचा बदला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 07:03 AM2020-01-08T07:03:56+5:302020-01-08T07:06:35+5:30
इराणमधील अमेरिकेचे लष्करी तळ लक्ष्य; इराणीयन रेव्होल्युशनरी गार्ड्सची कारवाई
तेहरान: कमांडर कासिम सुलेमानींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इराणमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांवर १२ पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती इराणीयन रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सनं (आयआरजीसी) दिली आहे. या वृत्ताला अमेरिकेनंदेखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेनं गेल्या आठवड्यात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे कमांडर कासिम सुलेमानी मारले गेले होते. सुलेमानी यांच्या हत्येचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यावेळी इराणनं दिला होता. यानंतर आता इराणनं अमेरिकेच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी न झाल्याची प्राथमिक माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या हल्ल्यात अमेरिकेचे ३० जवान मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.
#WATCH: Iran launched over a dozen ballistic missiles at 5:30 p.m. (EST) on January 7 and targeted at least two Iraqi military bases hosting US military and coalition personnel at Al-Assad and Irbil, in Iraq. pic.twitter.com/xQkf9lG6AP
— ANI (@ANI) January 8, 2020
काही दिवसांपूर्वी इराणचे कमांडर कासिम सुलेमानी इराकची राजधानी बगदादमध्ये मारले गेले. अमेरिकेनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सुलेमानी मारले गेल्यानंतर इराणनं अमेरिकेला थेट इशारा दिला होता. सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेतला जाईल, अशी आक्रमक भूमिका इराणनं घेतली होती. कालच इराणनं अमेरिकेच्या सर्व सैनिकांना दहशतवादी घोषित करणारं विधेयक मंजूर केलं. त्यामुळे आता इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव वाढण्याची शक्यता आहे.