चीनमधील भूकंपात ३० हून अधिक जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 12:04 PM2022-09-06T12:04:47+5:302022-09-06T12:05:42+5:30
भूकंपामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या नागरिकांना चीन सरकारतर्फे तातडीची मदत पुरविण्यात येणार आहे.
बीजिंग : चीनमधील सिचुआन प्रांतामध्ये सोमवारी झालेल्या ६.८ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाच्या धक्क्याने ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा प्रांत कोरोनाची साथ, दुष्काळ या समस्यांशी झुंजत असताना त्यात आता भूकंपाची भर पडली आहे.
सिचुआन प्रांतात सोमवारी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा काही दुर्घटनांत ३० हून अधिक जणांचा सोमवारी मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. भयभीत झालेले नागरिक घरातून बाहेर निघून रस्त्यावर गोळा झाले होते. सिचुआन प्रांतात भूकंपामुळे वीज व पाण्याचा पुरवठा, वाहतूक, दूरसंचार यंत्रणा या विस्कळीत झाल्या होत्या.
भूकंपामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या नागरिकांना चीन सरकारतर्फे तातडीची मदत पुरविण्यात येणार आहे.