पुरुषांपेक्षा महिलाच स्मार्टफोनच्या अधिक आहारी
By Admin | Published: May 31, 2016 02:23 PM2016-05-31T14:23:37+5:302016-05-31T14:23:37+5:30
स्मार्टफोनच्या वापरामध्ये पुरुषांशी तुलना करता महिलांचं प्रमाण जास्त असल्याचं दक्षिण कोरियामधील अजोऊ विद्यापीठातील प्रोफेसर चँग-जेई-येओन यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 31 - आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोनच्या आहारी गेलेला आहे. मात्र स्मार्टफोनच्या वापरामध्ये पुरुषांशी तुलना करता महिलांचं प्रमाण जास्त असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. महिला दिवसातून किमान चार तास स्मार्टफोन वापरात व्यस्त असतात. स्मार्टफोनच्या वापरावर अशा प्रकारे प्रथमच सर्वेक्षण करण्यात आलं आहे. दक्षिण कोरियामधील अजोऊ विद्यापीठातील प्रोफेसर चँग-जेई-येओन यांनी हे सर्वेक्षण केलं आहे. सहा कॉलेजमधील 1236 विद्यार्थ्यांवर केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावरच हा निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती चँग-जेई-येओन यांनी दिली आहे.
सर्वेक्षणामध्ये 52 टक्के महिला दिवसातून चार तास किंवा त्याहून जास्त वेळ स्मार्टफोनचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. महिलांशी तुलना करता पुरुषांच प्रमाण 29.4 टक्के आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांमधील 22.9 टक्के महिला सहा तास स्मार्टफोन वापरतात तर दुसकीडे फक्त 10.8 टक्के पुरुष दिवसातून सहा तास स्मार्टफोन वापरात व्यस्त असतात.
महिला स्मार्टफोनचा वापर सर्वात जास्त सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपडेट राहण्यासाठी करतात. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या साईट्सचा समावेश आहे. फोन कॉल, गेम्स आणि सर्च करण्यापेक्षा सोशल नेटवर्किंग साईट्सवर महिलांचा जास्त भर असतो. तर पुरुष मुख्यत: फक्त ब्रेकमध्ये फोनचा वापर करतात. महिला स्मार्टफोनच्या आहारी जाण्याचं अजून एक लक्षण म्हणजे अनेकदा समोरच्यासोबत बोलत असताना सारखं आपल्या स्मार्टफोनकडे पाहत असतात असंही सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे.
पाच महिलांपैकी एक महिला (20.1 टक्के) आपण स्मार्टफोन न वापरल्यास असुरक्षित वाटते असं सांगते. तर फक्त 8.9 टक्के पुरुषांना असं वाटतं. अनेक महिलांसाठी स्मार्टफोनचा वापर हा फक्त छंद राहिला नसून त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. नेटवर्किंग आणि कम्युनिकेशनची महिलांची इच्छा पुरुषांपेक्षा दांडगी आहे. यामुळेच त्या स्मार्टफोनच्या सहाय्यातून सोशल नेटवर्क सर्व्हिसवर अवलंबून असतात असं मत सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आलं आहे.