रस्त्याच्या कडेला बसले होते लोक, अचानक भूकंप आला अन्...; CCTV फुटेज पाहून थरकाप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 09:25 PM2023-09-09T21:25:56+5:302023-09-09T21:27:13+5:30
Morocco Earthquake : बचाव कार्यातील कर्मचार्यांना दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. भूकंपामुळे माराकेश या ऐतिहासिक शहरापासून ते अॅटलस पर्वतरांगांच्या परिसरात वसलेल्या गावांपर्यंत अनेक घरांचे अथवा इमारतींचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक देशांच्या नेत्यांनी मोरोक्कोला मदत देऊ केली आहे. बचाव कार्यातील कर्मचार्यांना दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जेव्हा भूकंप आला, तेव्हा घरात झोपलेले लोक बाहेर धावू लागले. सरकारी टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आलेल्या फुटेजमध्ये दिसत आहे की, माराकेश शहरातील लोक रात्री उशिरा रस्त्यांवर उभे असून घरात जाण्यासही घाबरत आहेत.
या भूकंपाचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यावरून, हा भूकंप किती भीषण होता, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही लोक एका इमारतीबाहेर बसलेले आहेत. याच वेळी भूकंप येतो आणि इमारत हालू लागते. येथे बसलेले तुरुण जमीन हादल्याचा भास होताच, तेथून पळ काढतात.
एवढेच नाही, तर या फुटेजमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक धावपळ करताना दिसत आहेत. काही लोक रस्त्यावर पडताना दिसत आहेत. याच वेळी इमारतीचा काही भागही कोसळताना दिसत आहे. हा व्हिडिओ बीएनओ न्यूजने सोशल मिडिया साइट एक्सवर अपलोड केला आहे. आतापर्यंत दीड लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
WATCH: 6.8-magnitude earthquake hits Morocco, killing more than 300 people pic.twitter.com/sOHj2HRSMs
— BNO News (@BNONews) September 9, 2023
काय म्हणतायत लोक? -
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, "भूकंपामुळे बहुतेक घरांचे नुकसान झाले आहे. आमचे शेजारी ढिगाऱ्याखाली दबले आहेत. लोक उपलब्ध साधनांचा वापर करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत." दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवताच आपण घरातून बाहेर धाव घेतल्याचे स्थानिक शिक्षक हमीद अफकार यांनी सांगितले.