Taliban: भारत अफगाणिस्तानला मदत पाठवणार? मॉस्कोत प्रतिनिधीमंडळ भेटीनंतर तालिबानचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 08:57 AM2021-10-21T08:57:43+5:302021-10-21T09:02:18+5:30
मॉस्को फॉर्मेटमध्ये भारत, चीन, पाकिस्तानसह १० देश सहभागी झाले होते.
मॉस्को: रशियाची राजधानी मॉस्को येथे मॉस्को-फॉर्मेटची सुरुवात झाली असून, अफगाणिस्तानावरतालिबानने (Taliban) ताबा मिळवल्यानंतर राजकीय आणि सैन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जागतिक स्तरावरील देशांचे प्रतिनिधीमंडळ यामध्ये सहभागी होत आहे. रशियाने तालिबान आणि अन्य वरिष्ठ गटांच्या प्रतिनिधींना मॉस्को-फॉर्मेटमध्ये सामील करून घेतले आहे. तालिबानच्या या प्रतिनिधींशी जागतिक स्तरावरील काही देशांचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. यातच भारतअफगाणिस्तानमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत पाठवले, असा दावा तालिबानच्या प्रतिनिधींनी केला आहे.
मॉस्को फॉर्मेटमध्ये भारत, चीन, पाकिस्तानसह १० देश सहभागी झाले होते. यामध्ये भारताच्या प्रतिनिधी मंडळाने तालिबानच्या प्रतिनिधी मंडळाशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीनंतर भारत अफगाणिस्तानला मानवतावादी व्यापक मदत देण्यास तयार झाला आहे, असा दावा तालिबान प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने केला.
भारताकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही
तालिबान प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने केलेल्या या दाव्याबाबत भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी दोहा येथे भारत आणि तालिबानच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली होती. भारताने याआधीही अफगाणिस्तानमध्ये पायाभूत सुविधांसह मानवतावादी उद्देशाने मदत केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भारताचे डी बाला व्यंकटेश वर्मा हे मॉस्कोमध्ये राजदूत आहेत. रशिया गेल्या अनेक वर्षांपासून भारताचा सर्वात मोठा संरक्षण भागीदार आहे. भारत आणि रशियाची अनेक उद्दिष्टे समान आहेत. भारत अमेरिकेचा समावेश असलेल्या क्वाड देशांचा भाग असला तरी, रशियासोबत स्वतंत्रपणे काम करत राहील. अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर भाष्य करताना, वर्मा म्हणाले, तालिबानच्या मुद्द्यावर भारत आणि रशियाचे मार्ग वेगवेगळे असले, तरी ध्येय एकच आहे. पीएम मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांच्यासह, दोन्ही देशांच्या शीर्ष मुत्सद्यांनी अफगाणिस्तानसंदर्भात अनेक वेळा चर्चा केली आहे. आम्ही मॉस्को फॉर्मेटमध्ये सोबत बसून यासंदर्भात चर्चा करत आहोत.