मंदिराच्या जागी मशीद बांधणार, शिफ्टिंगसाठी पैशांची ऑफर; मलेशियात मुस्लिमांचाच कडाडून विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:59 IST2025-03-25T13:59:13+5:302025-03-25T13:59:46+5:30
मंदिर असलेल्या जागेची खरेदी एका टेक्सटाईल कंपनीने केली आहे. त्या कंपनीला या जागेवर मशीद बनवायची आहे. याचे भूमीपूजन मलेशियाचे पंतप्रधान करणार आहेत.

मंदिराच्या जागी मशीद बांधणार, शिफ्टिंगसाठी पैशांची ऑफर; मलेशियात मुस्लिमांचाच कडाडून विरोध
मलेशियामध्ये १३० वर्षे जुने मंदिर स्थलांतरीत केले जाणार आहे. त्याच्या जागी मशीद उभारली जाणार असून बांधणाऱ्या कंपनीने आम्ही पैसे देतो, मंदिर इथून हटविण्याची ऑफर दिली आहे. राजधानी क्लालालंपूरमध्ये हे घडत आहे. मंदिर असलेल्या जागेची खरेदी एका टेक्सटाईल कंपनीने केली आहे. त्या कंपनीला या जागेवर मशीद बनवायची आहे. याचे भूमीपूजन मलेशियाचे पंतप्रधान करणार आहेत.
श्री पत्रा कालीअम्मा देवीचे हे मंदिर आहे. गेल्या १३० वर्षांपासून या जागेवर ते उभे आहे. ही जागा सरकारी होती. सरकारने २०१४ मध्ये ती परस्पर एका टेक्सटाईल कंपनीला विकली. जाकेल असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीचे संस्थापक मोहम्मद जाकेल याने ती जागा मशीद बनविण्याच्या उद्देशाने आणि मुस्लिमांना भेट देण्याच्या उद्देशाने खरेदी केली होती. या जागेवर मंदिर होते हे त्याला माहिती होते.
आता त्यांना त्या जागेवर मशीद उभारायची आहे. त्यामुळे जाकेल कंपनी मंदिर कमिटीसोबत चर्चा करत आहे. हे मंदिर दुसऱ्या जागी हलविण्यासाठी येणारा खर्च करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. २०२१ ला या कंपनीने मशीद निर्माण करण्याची परवानगी मिळविली होती. परंतू, मंदिर शिफ्ट होण्यापर्यंत कंपनीने काम पुढे ढकलले होते. आता येत्या २७ मार्चला मशीदीचा शिलान्यास पंतप्रधानांच्या हस्ते केला जाणार आहे.
या प्रकरणामुळे मलेशियामध्ये धार्मिक समानतेबद्दल दीर्घकाळ चाललेल्या वादविवादाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्याच वेळी, हिंदू मंदिर काढून त्याजागी मशीद बांधण्याच्या योजनेमुळे जनतेमध्ये संताप आहे. 'लॉयर्स फॉर लिबर्टी' संस्थेचे कार्यकारी संचालक झैद मलिक यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मंदिर, जाकील आणि नगरपालिका यांच्यात अजूनही चर्चा सुरू आहे, मग इतकी घाई का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान अन्वर यांना मंदिर हटवण्याची घाई असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
सोशल मीडियावरही कमालीचा विरोध केला जात आहे. मशीद दुसऱ्या जागी बांधली जावी, धार्मिक वाद टाळला जावा अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे हा वाद सुरु होताच पंतप्रधानांनी हे मंदिर कायदेशीर नाहीय, असे सांगितले आहे. तरीही धार्मिक भावना म्हणून या मंदिरासाठी दुसरीकडे जागा दिली जाईल आणि आर्थिक मदतही केली जाईल असे म्हटले आहे. एकंदरीतच हे मंदिर प्रकरण मलेशियात वातावरण तापविणार आहे.