दोन एजंट, तीन बॉम्ब अन् मध्यरात्री स्फोट; हानियाच्या हत्येसाठी मोसादने केला इराणच्या सैनिकांचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 01:03 PM2024-08-03T13:03:16+5:302024-08-03T13:03:46+5:30
मोसादने तेहरानमधील इस्माईल हानिया राहत असलेल्या इमारतीत बॉम्ब पेरण्यासाठी इराणी सुरक्षा रक्षकांचा वापर केल्याचे समोर आलं आहे.
Ismail Haniyeh Assassination : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष थांबवण्याचे नाव घेत नाहीये. बुधवारी हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया याची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हानिया याच्या हत्येमुळे आखाती देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादकडून हानिया यांची हत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच मोसादने इराणी सैन्यातील सैनिकांचा वापर करुन हानिया याला संपवल्याचे समोर आलं आहे.
इराणच्या तेहरानमध्ये इस्माईल हानिया याची हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरमध्ये हमासने केलेल्या हल्ल्यानंतर हानिया इस्रायलच्या हिटलिस्टवर आला होता. इराणी लष्कराच्या आयआरजीसीच्या गेस्ट हाऊसमध्ये हानिया याची रिमोट कंट्रोल बॉम्बच्या सहाय्याने हत्या करण्यात आली. हा बॉम्ब दोन महिन्यांपूर्वी तेहरानमध्ये तस्करी करून ठेवण्यात आला होता. बॉम्बचा स्फोट होताच गेस्ट हाऊसची कंपाऊंड भिंत कोसळली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. मात्र शेजारील खोलीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं नाही. त्यामुळे इस्माईल हानिया याच्या हत्येची योजना पूर्ण नियोजनानुसार आखल्याचे समोर आलं आहे.
इराणच्या राष्ट्रपती पदाच्या शपथविधी समारंभात हानिया नक्कीच इराणमध्ये येणार आणि गेस्ट हाऊसमध्ये राहणार हे मोसादला माहीत होते. महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण योजनेत मोसादने इराणमधील सैनिकांचा वापर केला. त्यामुळे आता इराणच्या नेत्यांमध्येही इस्रायलची भीती वाढली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, मोसादने बॉम्ब पेरण्यासाठी इराणच्या सुरक्षा दलाच्या सैनिकांना कामावर ठेवले होते. इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या अखेरच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी हानिया मे महिन्यात इराणमध्ये आला होता. तेव्हा त्याची हत्या करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र,गर्दीमुळे हे करता आले नाही.
त्यानंतर बुधवारी रात्री हानिया झोपलेल्या खोलीत मोठा स्फोट झाला आणि हानियासह त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. मोसादसाठी काम करणाऱ्या दोन इराणी सैनिकांनी तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे उघड झाले. हानिया याआधीही या गेस्टहाऊसमध्ये राहिले होते. त्यामुळे ते पुन्हा इथेच राहणार असल्याची पूर्ण कल्पना मोसादला होती. हानिया ज्या खोल्यांमध्ये थांबला होता आणि ज्या खोल्यांमध्ये तो राहण्याची शक्यता होती तेथे बॉम्ब ठेवण्यात आले होते.
इराणी अधिकाऱ्यांनी सैनिक गेस्टहाऊसमध्ये कसे घुसले आणि काही मिनिटांतच वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कसे गेले याचे फुटेज दाखवले. बॉम्ब पेरल्यानंतर ते इराणच्या बाहेरही गेले. यानंतर बुधवारी रात्री दोनच्या दरम्यान रिमोटचे बटण दाबले आणि हानिया यांचा मृत्यू झाला. या कामासाठी मोसादने अन्सार-अल-महदी प्रोटेक्शन युनिटचे एजंट नेमले होते, असं म्हटलं जात आहे. हा गट इराणमधील सर्वोच्च नेते आणि बाहेरून येणाऱ्या नेत्यांना संरक्षण देतो.