जगात भारी! 'सर्वात सुंदर इमारती'चं उद्घाटन; दुबईत 'म्युझियम ऑफ फ्युचर' खुलं, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:20 PM2022-02-23T17:20:49+5:302022-02-23T17:23:42+5:30
दुबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; जगातील सर्वात सुंदर इमारतीचं थाटामाटात उद्घाटन
दुबईमध्ये आयोजित एका भव्य समारंभात 'म्युझियम ऑफ द फ्युचर'चं उद्घाटन करण्यात आलं. या इमारतीला 'जगातील सर्वात सुंदर इमारत' म्हटलं जात आहे. या इमारतीचं बांधकाम पूर्ण होण्यास ९ वर्षांचा कालावधी लागला.
सात मजल्यांची असलेली ही वास्तू ७७ मीटर उंच आहे. ३० हजार वर्ग मीटरमध्ये तिची उभारणी करण्यात आला आहे. जगातील सर्वात उंच इमारत अशी ओळख असलेल्या बुर्ज खलिफापासून ही वास्तू हाकेच्या अंतरावर आहे. माणसाच्या भविष्याची रुपरेखा या संग्रहालयात पाहायला मिळेल.
'म्युझियम ऑफ द फ्युचर' ही वास्तू माणसाच्या विकासात येणारी आव्हानं आणि संधी या संकल्पनेवर आधारित आहे. वास्तू अतिशय देखणी असून जगभरात तिचं कौतुक होत आहे. यूएईचे कॅबिनेट मंत्री आणि दुबई फ्युचर फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद अल गर्गावी यांनी मंगळवारी या वास्तूचं उद्घाटन केलं. 'म्युझियम ऑफ द फ्युचर' एक जिवंत संग्रहालय असल्याचं ते म्हणाले.
संग्रहालयाचं डिझाईन वास्तुरचनाकार शॉन किल्ला यांनी केलं आहे. अभियांत्रिकी कौशल्याचा हा अतिशय उत्तम नमुना आहे. स्टेनलेस स्टीलपासून या वास्तूची निर्मिती करण्यात आली आहे. रोबोटच्या वापरातून तयार करण्यात आलेल्या १,०२४ कलाकृती या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी ही वास्तू छगमगाटात न्हाऊन निघते. त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडते.