जर्मनीतील सर्वात खतरनाक सिरियल किलर; ८५ रुग्णांना ठार मारणाऱ्या परिचारकाला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 02:55 AM2019-06-07T02:55:57+5:302019-06-07T02:56:13+5:30
विषारी इंजेक्शन टोचून हत्या
ओल्डेनबर्ग : जर्मनीमध्ये रुग्णालयांतील ८५ रुग्णांची विषारी इंजेक्शन टोचून हत्या करणारा परिचारक (नर्स) निएल्स होगेल याला तेथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दुसºया महायुद्धानंतरच्या जर्मनीच्या इतिहासातील सर्वात खतरनाक सिरियल किलर म्हणून निएल्स कुख्यात आहे.
निएल्स ही शिक्षा सुनावली पण त्याने ज्या रुग्णांची हत्या केली त्यांच्या नातेवाईकांच्या मनात असलेले अनेक प्रश्न आजही अनुत्तरित राहिले आहेत असे जर्मन न्यायाधीश सॅबेस्टियन बुहरमन यांनी म्हटले आहे. नएल्सने २००० ते २००५ या काळात ८५ रुग्णांची हत्या केली होती. एका रुग्णाची विषारी इंजेक्शन टोचून हत्या करताना तो रंगेहाथ पकडला गेला. त्यानंतर त्याची काही महाभयंकर कृत्ये पोलीस तपासात उघडकीस आली.
निएल्सने आजवर २०० हून अधिक रुग्णांच्या हत्या केल्या असाव्यात असा पोलिसांचा संशय आहे. त्याचे पुरावे गोळा करण्यासाठी १३० रुग्णांच्या शवचिकित्सेचे अहवाल पोलिसांनी मिळविले असून त्याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. निएल्स याला सहा हत्यांपायी याआधीही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो गेली दहा वर्षे तुरुंगातच आहे. ज्याने सेवा करायची तो परिचारकच रुग्णांची हत्या करतो हे अतिशय क्रूर कृत्य आहे, असे न्यायाधीश सॅबेस्टियन बुहरमन यांनी म्हटले आहे.
निएल्स अवघा ४२ वर्षांचा असून त्याला आता अधूनमधून विस्मरण होते. त्यामुळे आपण नेमक्या किती हत्या केल्या हे तो सांगू शकत
नाही. घटना सांगताना त्यातील तपशील, कालावधी यांचीही त्याच्याकडून कधीकधी गल्लत होते. ८५ रुग्णांच्या हत्यांसंदर्भातील खटल्याच्या सुनावणीच्या दिवशी मृत रुग्णांच्या नातेवाईकांची निएल्सने माफी मागितली.
दाखल झाले तीन खटले
२००५ साली डेल्मेनहॉर्स्ट येथील रुग्णालयात एका रुग्णाला विषारी इंजेक्शन टोचून ठार मारताना निएल्सला पकडण्यात आले. त्यानंतर खटला चालवला जाऊन त्याला २००८ साली सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
मृत रुग्णांच्या नातेवाईकांच्या दबावामुळे त्याच्यावर २०१४ साली दुसरा खटला दाखल करण्यात आला. त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तिसरा खटला त्याच वर्षी दाखल झाला. त्यातही त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.