‘मोस्ट डेडली वूमन’ २० वर्षांनी तुरुंगाबाहेर; शीतयुद्धाच्या काळातील थरारक किश्श्यांची चर्चा रंगली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:24 AM2023-01-10T11:24:20+5:302023-01-10T11:24:34+5:30
रशिया आणि अमेरिका यांच्यातील हे शीत युद्ध तब्बल १९४६ ते १९९० पर्यंत चाललं. १९९१मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन १५ स्वतंत्र देशांमध्ये त्याची शकलं झाली आणि हे शीतयुद्ध संपलं.
शीतयुद्ध (कोल्ड वॉर), डबल एजंट.. हे शब्द तुम्ही ऐकले आहेत? त्यांचा अर्थ तुम्हाला माहीत आहे? शीतयुद्ध हे एक अशा प्रकारचं यु्द्ध; ज्यामध्ये प्रत्यक्षात, सैनिक, हत्यारं यांचा वापर होत नाही, तरीही ज्या देशांमध्ये हे युद्ध सुरू होतं, ते एकमेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शीतयुद्ध आपल्याला माहीत आहे, ते मुख्यत: रशिया आणि अमेरिका यांच्यामधलं. जगातील सर्वात शक्तिमान देश बनण्यासाठीची त्यांच्यामधील वर्चस्वाची लढाई अख्ख्या जगानं पाहिली, अनुभवली आहे.
रशिया आणि अमेरिका यांच्यातील हे शीत युद्ध तब्बल १९४६ ते १९९० पर्यंत चाललं. १९९१मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन १५ स्वतंत्र देशांमध्ये त्याची शकलं झाली आणि हे शीतयुद्ध संपलं. त्यानंतर अमेरिका हा एकच सर्वशक्तिमान, बलशाली देश म्हणून जगात मानला जाऊ लागला. तरीही अनेक देशांचं दुसऱ्या देशांसाठी हेरगिरी करणं, ‘एजंट’ म्हणून काम करणं सुरूच होतं, ते अजूनही थांबलेलं नाही. शीतयुद्धाच्या काळात एकमेकांच्या देशांत गुप्तहेर, ‘एजंट’ धाडणं, गोपनीय माहिती दुसऱ्या देशाला पुरवणं हे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. काही महाभाग तर असे होते, ज्यांनी एकाच वेळी दोन-दोन देशांसाठी ‘एजंट’ म्हणून काम सुरू केलं. त्या काळात ही प्रकरणं इतकी गाजली की, त्यावर अनेक चित्रपटही निघाले. शीतयुद्धाच्या काळातील एक ‘डबल एजंट’ त्यावेळी खूपच गाजली होती. तिचं नाव ॲना मॉण्टेस.
खरं तर तिनं अमेरिकेची ‘एजंट’ म्हणून क्युबा या देशाविरुद्ध हेरगिरी सुरू केली; पण प्रत्यक्षात आपल्याच देशाला धोबीपछाड देताना, अमेरिकेचीच गुप्त माहिती कित्येक वर्षे क्यूबाला पुरवून ‘डबल एजंट’ म्हणून काम केलं. तिचे हे कारनामे कळल्यानंतर २००१मध्ये अमेरिकेनं आपल्याच देशाच्या या ‘डबल एजंट’ला अटक केली आणि तिला तुरुंगात टाकलं. पण त्याआधी तब्बल १६ वर्षे ॲनानं अमेरिकेच्या नाकाखाली आपल्याच देशाची संवेदनशील माहिती क्यूबाला पुरवली! वीस वर्षांच्या तुरुंगवासानंतर अमेरिकेनं नुकतीच तिची सुटका केली आहे. त्यामुळे कोल्ड वॉर, ‘डबल एजंट’ ॲना आणि त्या काळातील थरारक किश्श्यांची चर्चा आता पुन्हा एकदा जगभरात रंगली आहे.
ॲना आता ६५ वर्षांची आहे, त्याकाळातील तिच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या खुणा आजही तिच्याकडे पाहिल्यावर कळतात, दिसतात. आपलीच ‘खुफिया एजंट’ आपल्याच देशाविरुद्ध तब्बल १६ वर्षे काम करते आहे, हे कळल्यावर अमेरिकेच्या पायाखालची वाळू अक्षरश: सरकली होती. ‘मोस्ट डेडली वूमन’ म्हणूनही तिला त्या काळात ओळखलं जात होतं. कारण, अमेरिकेनं क्यूबात जे ‘ऑपरेशन’ सुरू केलं होतं, त्याला तिच्याचमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धक्का बसला होता. अनेक अमेरिकन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते!
अत्यंत देखणी आणि बुद्धिमान ॲनावर अमेरिकेनं ‘इंटेलिजन्स ॲनालिस्ट’ म्हणून क्यूबाची संवेदनशील माहिती गोळा करण्याची जबाबदारी सोपवली. अर्थातच त्यासाठी आपलं सौंदर्य आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टी तिनं वापरल्या; पण त्या आपल्याच देशाविरुद्ध. त्यामुळे तिच्या कारवायांची जराशीही शंका कोणालाच आली नाही.
उलट ‘उत्तम’ कामगिरीमुळे आपल्या कारकिर्दीत तिला अनेकदा प्रमोशनही मिळालं! ‘क्वीन ऑफ क्यूबा’ म्हणून तिची प्रशंसाही केली गेली. आपली अतिशय संवेदनशील, महत्त्वाची माहिती कोणीतरी क्यूबाला पुरवतं आहे, याची कुणकुण काही वर्षांनंतर अमेरिकेला आली, पण कोणीही ॲनावर चुकूनही संशय घेतला नाही. ‘डबल एजंट’ ॲनाची कामाची पद्धत अतिशय वेगळी होती. ती कधीच, कोणतीच माहिती, कोणतीही फाईल घरी घेऊन गेली नाही, कधीच कुठल्या गोष्टींचे फोटो काढले नाहीत. संशयास्पद हालचाल केली नाही. अमेरिकेत ९/११ हल्ला झाल्याच्या बरोब्बर दहा दिवस आधी तिला अटक करण्यात आली. ॲनानं आपल्याच देशाविरुद्ध हेरगिरी केली, कारण तिला आपल्या देशाची धोरणं मान्य नव्हती. आपला देश इतर देशांची मुस्कटदाबी करतो, असं तिला वाटत होतं..
कॉम्प्युटरनं ‘घात’ केला!
ॲना सगळी गोपनीय माहिती आपल्या डोक्यात ‘स्कॅन’ करून ठेवायची, लक्षात ठेवायची आणि घरी गेल्यावर आपल्या ‘खास’ कॉम्प्युटरवर एका ‘कोड’मध्ये रूपांतरित करून, ‘डिस्क’मध्ये स्टोअर करायची. क्यूबाकडून रेडिओ शॉर्ट वेव्हच्या माध्यमातून ‘खबर’ मिळाली की ही डिस्क क्यूबाला रवाना केली जायची. ती सापडली मुख्यत: दोन कारणांनी. एकतर ती क्यूबाला जाऊन आली होती आणि दुसरं म्हणजे तिचा कॉम्प्युटर. जो ‘खास’ कॉम्प्युटर तिनं त्यावेळी घेतला होता, तो त्यावेळी फक्त तिच्याचकडे होता! त्यामुळे अखेर संशयाची सुई तिच्याकडे वळली आणि एक एक धागे जुळत गेले!