सर्वात महाग घटस्फोट
By Admin | Published: October 22, 2015 04:03 AM2015-10-22T04:03:06+5:302015-10-22T04:03:06+5:30
रशियन अब्जाधीश दमित्री रिबोलवलेव व त्यांची पत्नी अॅलेना यांच्यात घटस्फोटासाठी झालेला करार ऐकून तुमची शुद्धच हरपेल. या घटस्फोटाचे शतकातील सर्वात महाग घटस्फोट
जिनेव्हा : रशियन अब्जाधीश दमित्री रिबोलवलेव व त्यांची पत्नी अॅलेना यांच्यात घटस्फोटासाठी झालेला करार ऐकून तुमची शुद्धच हरपेल. या घटस्फोटाचे शतकातील सर्वात महाग घटस्फोट म्हणून वर्णन होत आहे.
दमित्री आणि अॅलेना यांनी सायप्रसमध्ये विवाह केला होता. तब्बल २३ वर्षांच्या सहजीवनानंतर २००८ मध्ये त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र, घटस्फोटाच्या प्रक्रियेवरून उभयतांत कोर्टकज्जे सुरू झाले. मे २०१४ मध्ये स्वीस न्यायालयाने घटस्फोटानंतर अॅलेना रिबोलवलेव यांना दोन खर्व ६६ अब्ज २४ कोटी ११ लाख ८२ हजार रुपये एवढा निर्वाह भत्ता द्यावा, असा निकाल दिला होता. ही रक्कम दमित्रींच्या एकूण मालमत्तेच्या निम्मी होती. त्यानंतर अलीकडे जिनिव्हा येथील अपीलीय न्यायालयाने २०१४ चा निर्णय बदलत निर्वाह भत्त्याची रक्कम ३८ अब्ज रुपयांपर्यंत खाली आणून दोन रिअल इस्टेट कंपन्यातील भागभांडवल अॅलेनाच्या नावे करण्याचा आदेश दिला होता. मात्र, अॅलेना यांना हा निकाल मान्य नव्हता. अपिलीय न्यायालयाने दमित्री यांच्या २००८ मधील मालमत्तेऐवजी २००५ मधील मालमत्तेच्या आधारे निर्वाहभत्ता ठरवला, अशी तक्रार करत अॅलेना यांच्या वकिलांनी निकालाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तेथे सुनावणी होण्यापूर्वीच उभयतात समेट झाला. मंगळवारी या दोघांनी संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देऊन घटस्फोटासाठी त्यांच्यात सहमती झाली असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)