धक्कादायक! पाकिस्तानमधले 69 टक्के लोक इंटरनेटबाबत अनभिज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:36 PM2018-11-13T12:36:07+5:302018-11-13T12:43:11+5:30
पाकिस्तानमधल्या वय वर्षं 15पासून ते 65 वर्षांपर्यंतच्या 69 टक्के लोकांना अजूनही इंटरनेट काय असतं याची माहिती नाही.
इस्लामाबाद- पाकिस्तानमधल्या वय वर्षं 15पासून ते 65 वर्षांपर्यंतच्या 69 टक्के लोकांना अजूनही इंटरनेट काय असतं याची माहिती नाही. सूचना-संचार तंत्रज्ञाना(आयसीटी)च्या सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. खरं तर पाकिस्तानमधलं वृत्त पत्र असलेल्या डॉननं श्रीलंकेच्या थिंक टँक लिरनेएशियाकडून करण्यात आलेल्या आयसीटीच्या सर्व्हेचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
या सर्व्हेमध्ये पाकिस्तानातल्या 2 हजार कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये 15 वर्षांपासून 65 वर्षांच्या वयापर्यंतच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. 15 ते 65 वर्षांच्या लोकसंख्येमध्ये फक्त 30 टक्के लोकांना इंटरनेटसंदर्भात माहिती आहे. हा सर्व्हे 2017च्या ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत करण्यात आला होता. या सर्व्हेतून किती युजर्स आयसीटी सुविधांचा वापर करतात हे समोर आलं आहे.
रिपोर्टनुसार, पाकिस्तानची टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए)च्या वेबसाइटवर 152 मिलियन सक्रिय सेल्युलर सब्सक्रायबर असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व्हेत फक्त पाकिस्तानच नव्हे, तर दुसऱ्या आशियाई देशांमधील इंटरनेट सेवेसंदर्भात जागरूकता कमी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पुरुषांच्या तुलनेत पाकिस्तानमधल्या महिला इंटरनेटचा 43 टक्के कमी वापर करतात. तर भारतात हे प्रमाण 57 टक्के असून, बांगलादेशमध्ये 62 टक्के आहे.