अमेरिकेत सर्वाधिक बोलली जाणारी भारतीय भाषा माहितीय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:26 PM2019-10-31T12:26:22+5:302019-10-31T12:47:40+5:30
विविध देशात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात.
वॉशिंग्टन - विविध देशात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. भारतात हिंदी भाषा ही जास्त बोलली जाते. मात्र आता परदेशातही हिंदी भाषेची चर्चा रंगली आहे. अमेरिकेमध्ये हिंदी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भारतीय भाषा ठरली आहे. हिंदी भाषेनंतर गुजराती आणि तेलुगु भाषेचा नंबर लागतो. मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलै 2018 पर्यंत 8.74 लाख लोकांसोबत अमेरिकेत हिंदी भाषा सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ठरली आहे. 2017 च्या तुलनेत 1.3 टक्क्यांनी यामध्ये वाढ झाली आहे.
2010 नंतर म्हणजेच आठ वर्षात हिंदी भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येत 43.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिंदी भाषेसोबतच तेलुगु भाषा ही अमेरिकेत सर्वात जास्त बोलली जाणारी दुसरी भाषा ठरली आहे. 2010 ते 2018 या दरम्यान तेलुगु भाषा बोलणाऱ्या व्यक्तींत 79.5 टक्के वाढ झाली आहे. अमेरिकन कम्युनिटी सर्व्हे (एसीएस) 2018 च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 6.73 कोटी निवासी लोक हे 5 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असून ते आपल्या घरामध्ये इंग्रजीशिवाय अन्य भाषा बोलत असल्याचे समोर आले आहे.
लोकसंख्येनुसार अमेरिकेत 21.9 टक्के लोक आपल्या घरात एक परदेशी भाषा बोलतात. 2017 च्या आकडेवारीनुसार यामध्ये 21.8 टक्के इतकी वाढ झाली आहे. एसीएसच्या या सर्व्हेनुसार अमेरिकेत 20 लाखांहून अधिक भारतीय कुटुंबाचा यामध्ये समावेश आहे. अमेरिकेतील एकूण लोकसंख्येत बंगाली भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण 3.75 लाख आहे. गेल्या आठ वर्षात हे प्रमाण जवळपास 68 टक्क्यांनी वाढले आहे. 1 जुलै 2018 पर्यंत तमिळ बोलणाऱ्यांचे प्रमाण 3.08 लाख आहे. ज्यामध्ये 67.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारताशिवाय अन्य देशातील व्यक्तीही बंगाली भाषा अमेरिकेत बोलत आहेत. यात प्रामुख्याने बांगलादेशच्या लोकांचा समावेश आहे. तमिळ बोलणाऱ्यांमध्ये श्रीलंका, सिंगापूर आणि मलेशिया या देशातील नागरिकांचा समावेश आहे. गुजराती आणि तेलुगु भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या 2017 आणि 2018 मध्ये थोडी कमी झाली आहे. गुजराती बोलणाऱ्यांची संख्या 4.19 लाख आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 3.5 टक्के कमी झाली आहे. 1 जुलै 2018 पर्यंत 4 लाख तेलुगु भाषिक लोक अमेरिकेत होते.