मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफची गोळ्या घालून हत्या; पठाणकोट हल्ल्याचा होता मास्टरमाईंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 12:04 PM2023-10-11T12:04:41+5:302023-10-11T12:05:00+5:30
भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफ याची पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. शाहीद पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड होता.
भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. शाहिद पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. एनआयएने शाहिदविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो भारत सरकारच्या यादीत असलेला दहशतवादी होता.
मोठी बातमी! नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार
शाहिद तालिफ हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरानवाला येथील रहिवासी होता. तो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो सियालकोट सेक्टरचा कमांडर होता, तो भारतात दहशतवाद्यांच्या प्रवेशावर लक्ष ठेवत होता आणि दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होता. शाहिद लतीफला १२ नोव्हेंबर १९९४ रोजी अटक करण्यात आली आणि १६ वर्षे भारतीय तुरुंगात राहिल्यानंतर २०१० मध्ये वाघा मार्गे हद्दपार करण्यात आले.
२ जानेवारी २०१६ रोजी पंजाबमधील पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याचा शाहीद लतीफ हा मास्टरमाईंड होता. याशिवाय इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केल्याच्या प्रकरणातही शाहिद आरोपी होता.
२०१६ मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कराचे सात जवान शहीद झाले होते. पठाणकोट एअरफोर्स स्टेशन सीमेजवळ आहे. या ठिकाणी मोठी शस्त्रे ठेवली जातात. युद्धाच्या बाबतीत, संपूर्ण रणनीती येथूनच अंमलात आणली जाते. १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही या हवाई दलाच्या स्टेशनने मोठी भूमिका बजावली होती. मिग-21 लढाऊ विमानांसाठी हे बेस स्टेशन आहे.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम याची पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. हिजबुल मुजाहिद्दीनचा लॉन्चिंग कमांडर बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम याचा रावळपिंडीत गोळ्या घालून खात्मा करण्यात आला. गेल्या वर्षीच भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले होते. रावळपिंडीत बसून तो जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रसद आणि इतर साधनसामुग्री पुरवत होता.